टाकळी ढोकेश्वर -पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथए पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने जलसंधारणाची कामे सुरू आहेत. या कामाची दखल घेत थेट परदेशातून या कामासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
पारनेर तालुक्यासह टाकळी ढोकेश्वरला दुष्काळ हा नेहमीचाच. बहुतांश कुटुंबे शेती किंवा शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहेत. ही जाणीव आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठान, पारनेर तालुका पत्रकार संघ, सावली प्रतिष्ठान, यात्रा समिती, तरुण मंडळे व टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामस्थांना झाली. त्यामुळे त्यांनी एकत्र होत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची भरीव कामे हाती घेतले. मात्र त्यासाठी निधीची जणजण भासू लागली.
प्रथम आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सदस्यांनी काही प्रमाणात निधी जमा केला. पण हा निधी तोकडा होता. त्यानंतर ग्रामस्थांनीही निधी दिला. पण कामाची व्याप्ती मोठी असल्याने गावातील कामानिमित्त शहरात, व परदेशात असलेल्या भूमिपुत्रांना आवाहन करण्यात आले. त्यांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला.
त्यांनी दिलेल्या निधीतून गावात अवघ्या 11 ते 12 दिवसांत चार पोकलेनच्या माध्यमातून पाच केटी वेअरचे काम पूर्ण झाले असून, सहाव्या केटी वेअरचे विस्तारीकरण व खोलीकरणाचे काम प्रगतिपथावर आहेत. जाधववस्ती पाझर तलावाचेही खोलीकरण. अमरधाम ते निवडुंगेवाडी दरम्यान ओढ्यावर असलेले सहा केटी वेअर आदी कामे पूर्णत्वाकडे जात आहेत.