Nevase News : प्रशासनाच्या आदेशाला हरताळ; कुकाण्यात विनापरवानगी डीजे वाजवणाऱ्यांवर कारवाई
Nevase News : या कारवाईत डीजे वाहनासह साहित्य जप्त करण्यात आले असून, नेवासे तालुक्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नेवासे : सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र आणि दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांनी डीजे आणि डॉल्बीच्या वापराबाबत निर्बंध घातले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून कुकाणा (ता. नेवासे) येथे कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत डीजे वाहनासह साहित्य जप्त करण्यात आले असून, नेवासे तालुक्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुकाणा-भेंडा रस्त्यावरील कुकाणा बसस्थानकासमोर जामगाव (ता. गंगापूर) येथील डीजे चालक नबीश बादशहा सय्यद आणि डीजे ऑपरेटर विठ्ठल हे सार्वजनिक ठिकाणी डीजे-डॉल्बी वाजवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी त्यांच्याकडे डीजे-डॉल्बी वाजविण्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. मात्र, संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अनधिकृतपणे डीजे वाजविल्याप्रकरणी दोघांविरुद्ध नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस हवालदार बंटी काळोखे यांनी कायदेशीर तरतुदींनुसार डीजे वाहनासह संबंधित साहित्य जप्त करण्याची कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या ध्वनिप्रदूषण आणि डीजे-डॉल्बी वापरासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.





