Delhi – देशातील सर्वांत व्यस्त दिल्ली विमानतळावर शुक्रवारी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीत तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे सुमारे ८०० विमान उड्डाणांना विलंब झाला. तर, जवळपास २० उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीत मागील दोन दिवसांपासून अधूनमधून समस्या जाणवत होत्या. मात्र, त्या समस्यांमुळे शुक्रवारी पहाटेपासून प्रणाली लक्षणीयरित्या प्रभावित झाली. त्याचा परिणाम होऊन बहुतांश उड्डाणे काही तासांसाठी रखडली. प्रणाली प्रभावित करणाऱ्या तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी तंत्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. प्रणाली प्रभावित झाल्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या उड्डाणांवर परिणाम झाला.