मलिकांच्या आरोपांवर फ्लेचर पटेल यांची माजी सैनिक असल्याची सारवासारव

मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीवर पुराव्यानिशी गेले काही दिवस आरोप करणारे महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पुराव्यानिशी एनसीबीवर हल्लाबोल केला आहे. एनसीबीने एका जप्तीच्या प्रकरणात फ्लेचर पटेल नावाच्या इसमाला साक्षीदार बनवून त्याच्या सह्या घेतल्या आहेत. आता फ्लेचर पटेल यांनी मलिक यांच्या आरोपांवर माजी सैनिक असल्याचं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
फ्लेचर पटेलचा जस्मीन वानखेडेंबरोबरच फोटो मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सादर केला. या जस्मीन पटेल या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या भगिनी आहेत. तसेच खुद्द समीर वानखेडे यांच्या सोबतही फ्लेचर पटेल यांचा फोटो नवाब मलिक यांनी पत्रकारांना सादर केला.
फ्लेचर पटेल हे समीर वानखेडे यांचे परिचीत असून ते एकमेकांना चांगले ओळखतात. अशा ओळखीच्या माणसालाच समीर वानखेडे यांनी तीन जप्तीच्या कारवाईत साक्षीदार व पंच म्हणून कसे उभे केले असा सवाल त्यांनी केला आहे.
यावर फ्लेचर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण समीर वानखेडे यांचे परिचित आहोत. त्यांच्या मातोश्रींमुळे आमचा घरोबा असल्याचे सांगितलं. मात्र तीन वेळा तुम्हीच साक्षीदार कसे, या प्रश्नाचं उत्तर देणं फ्लेचर यांनी टाळलं.
तसेच आपण माजी सैनिक आहोत, मी देशाची सेवा करण्यासाठी कटीबद्ध असल्याचं म्हटलं. याउलट पटेल यांनी आम्ही एनसीबीचे योद्धा झालो आहोत तर नवाब मलिकांना का मिरच्या झोंबल्या, असा प्रश्न उपस्थित केला.
वास्तविक पाहता, न्यालयालयाकडून देखील एकपेक्षा अनेक प्रकरणांमध्ये एकच पंच ठेवल्यास संशय व्यक्त करण्यात येतो.

