पिंपरी – जगभरात मंदीचे सावट घोंघावत असताना देशात मात्र सर्वच क्षेत्र सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. मंदीचा मोठा परिणाम बांधकाम क्षेत्रावर पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. परंतु सध्यातरी तशी परिस्थिती दिसत नाही. सदनिकांबाबत विचारपूस करणाऱ्यांची संख्या अजूनही तशीच आहे. परंतु सध्या बांधकाम व्यावसायिकांना सर्वांत मोठी समस्या भेडसावत आहे ती म्हणजे घर घेण्यास इच्छुक नागरिक वाढीव दर मान्य करण्यास तयार नसून जुन्या दरांवरच टाम आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये कच्चा माल, मनुष्यबळ याच्यात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रेडी रेकनरमध्ये राज्य सरकारने कोणतीही वाढ न केल्याने बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला असला तरी इतर बाबींमध्ये झालेल्या वाढीने सदनिकांच्या अंतिम खर्चात वाढ झाली आहे. घर घेण्यास इच्छुक नागरिक घर घेण्यापूर्वी सगळीकडचे दर व इतर बाबी तपासून अभ्यास करतात. हे नागरिक आता वाढीव दर देण्यास तयार नाहीत आणि जुन्या दरांवरच ठाम आहेत. यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिक आपला नफा कमी करत विक्री करण्यास सुरुवात केली असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिक आणि बिल्डींग मटेरियल असोसिएशनचे अध्यक्ष विनोद बन्सल यांनी दैनिक प्रभात शी बोलताना सांगितले की, गेल्या काही महिन्यांमध्ये सिमेंट व इतर बांधकाम साहित्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रेडी रेकनरचे दर वाढलेले नाहीत, ही दिलासादायक बाब आहे. परंतु घर घेण्यासाठी पूर्वी ज्यांनी चौकशी केली होती, ते अजूनही त्याच दरावर घर घेण्यास इच्छुक आहेत. किमान दहा टक्के दरवाढ अपेक्षित आहे, परंतु ग्राहक जुन्या दरांसाठी आग्रही आहेत. अलिकडेच गुढीपाडवा गेला आणि पुढे अक्षयतृतीयेचा मुहूर्त आहे. परिणामी माल न विकता ठेऊन पैसे अडकविण्याऐवजी अनेक व्यावसायिक जुन्याच दरावर विक्रीसाठी तयार होत आहेत. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुकींगची शक्यता पाहता बांधकाम व्यावसायिक देखील पुन्हा एकदा आर्थिक गणितांची जुळवा-जुळव करत आहेत.
कच्चा माल, लेबर यात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच विक्री खर्चही वाढला आहे. परंतु ग्राहक त्यांना माहीत असलेल्या जुन्या दरांवरच ठाम आहेत. दर वाढविल्यास प्रतिसाद नगण्य होत असल्याने जुन्या दरावर विक्री करणे बांधकाम व्यावसायिकांना आर्थिक दृष्ट्या अवघड जात आहे. – विनोद बन्सल, बांधकाम व्यावसायिक
विक्री खर्चातही वाढ
बडे बांधकाम व्यावसायिक प्रकल्प बांधून तयार होत असताना वेगवेगळ्या सेल्स असोसिएट्ससोबत विक्रीचे करार करतात. हे सेल्स असोसिएट्स या सदनिका विक्री करुन देण्यासाठी मध्यस्थाच्या स्वरुपात प्रयत्न करत असतात. आता अशा बड्या असोसिएट्सने देखील आपल्या कमिशनमध्ये वाढ केली असून अनेक सेल्स कंपन्या आता दोन टक्क्यांवर थेट पाच टक्के ब्रोकरेज मागत असल्याचेही बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रकल्प तयार करत असताना विक्री खर्चातही मोठी वाढ झाली आहे
भविष्यात दर वाढण्याची शक्यता
एकीकडे जागतिक मंदी असताना दुसरीकडे मात्र भारतात बांधकाम क्षेत्रावर त्याचा अजून मोठा परिणाम जाणविला नसल्याचे सांगत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले की, दिवसें-दिवस जमिनीचे दर आकाशाला भिडत असल्याने सदनिकांचे दर भविष्यात वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याच प्रमाणे सिमेंट कंपन्या मनाला येईल त्याप्रमाणे दरांमध्ये बदल करत असतात, यामुळे सर्व गणिते बिघडतात. सरकारने या कंपन्यांवर नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे.