भिगवण – भादलवाडी (ता. इंदापूर) येथील तलाव हा सारंगागार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या तलावात मोठ्या संख्येने फ्लेमिंगो (रोहित पक्षी) घरटी बनवत असतात. यावर्षी मात्र तलावाने तळ गाठल्यामुळे फ्लेमिंगोंनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. उजनी धरणाचा परिसर हा विविध देशी-परदेशी पक्षांचे नंदनवन म्हणून ओळखला जाते. भादलवाडी तलाव हा तर फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षांच्या राहण्याचे आवडते ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी फ्लेमिंगो हजारोंच्या संख्येने येतात व याठिकाणी आपली घरटी बनवत असतात. मात्र, यावर्षी तलावात पुरेसे पाणी नाही. पक्ष्यांचा आसरा असलेली झाडे आणि पाण्यातील अंतर जास्त असल्याने पक्ष्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे यावर्षी पक्ष्यांनी घरटी केलेली नाहीत. फ्लेमिंगो बरोबरच इतर पक्षीही कमी संख्येने आढळत आहेत. शेतीबरोबरच पक्ष्यांच्या राहण्याची गरज म्हणून या तलावात दरवर्षी पुरेसे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या भागात उजनी धरण क्षेत्रात विविध परदेशी पक्ष्यांची रेलचेल असते. त्यामुळे या भागात देशी विदेशी पर्यटक, पक्षी अभ्यासक, निरीक्षक गर्दी करत असतात. परंतू यंदा या तलावात पाणी नसल्यामुळे परदेशी फ्लेमिंगो पाहुण्यांनी पाठ फिरवली आहे. फ्लेमिंगो पक्षी हे संवेदनाशील असतात. योग्य प्रमाणात पाणी व झाडांचा आडोसा असल्यावरच त्या ठिकाणी पक्षी घरटी बनवितात. यावर्षी तलावात पाणी नसल्याने पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. जलसंधारण विभागाला विनंती की त्यांनी दरवर्षी पाण्याचे नियोजन करावे. -ऍड. महेश कन्हेरकर, पक्षी अभ्यासक.