पुसेसावळी (प्रतिनिधी) -वांझोळी, ता. खटाव येथील नऊ जणांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून मायणी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांचे करोना अहवाल शनिवारी (दि. 30 मे) रात्री पॉझिटिव्ह आल्याने गावातील रुग्णाची संख्या सातवर गेली आहे. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.
विक्रोळी (मुंबई) येथून बारा जण वांझोळी येथे आले होते. या लोकांना गावाबाहेरच्या वस्तीवर ठेवून त्यांना अत्यावश्यक सेवा दिल्या जात होत्या. त्यातील 54 वर्षीय व्यक्तीस दि. 25 मे रोजी त्रास होऊ लागल्याने औषधोपचारासाठी पाठवून त्याची पत्नी व मुलगा यांना विलगीकरणात दाखल करण्यात आले होते. विलगीकरणात ठेवलेल्यांपैकी बाधित वक्तीच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. बाकीच्या नऊ जणांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून मायणी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी दोन पुरुष व तीन महिलांचे अहवाल काल (दि. 30 मे) रात्री पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थ हादरले आहेत.
ग्रामपंचायतीच्यावतीने गावात दररोज जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून संपूर्ण गाव यापूर्वीच सील केले आहे. आरोग्य विभागातर्फे घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी केले आहे.