Pimpri : तीन महिन्यांत पालिकेच्या तिजोरीत पाचशे कोटी जमा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच अवघ्या ९० दिवसांमध्ये तब्बल ५२२ कोटी ७२ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या तिमाहीत कर वसुलीचा पाचशे कोटींचा आकडा पार करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्या तिमाहीत नागरिकांनी जास्तीतजास्त मालमत्ता कर भरावा, यासाठी कर संकलन विभागाने ३० जूनपर्यंत विविध सवलती जाहीर केल्या होत्या. या सवलतींना नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे कर संकलनामध्ये वाढ झाली आहे.
महापालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ९६६ कोटींची मालमत्ता कर वसुली केली होती. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये हा आकडा पार करण्यासाठी महापालिकेने सुरुवातीपासून नियोजन केले आहे. पहिल्या तिमाहीमध्येच जास्तीतजास्त कर वसूल व्हावा, यासाठी ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यासह विविध सवलती जाहीर केल्या होत्या. या सवलतींना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १ एप्रिल ते ३० जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत तब्बल ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे.
गेल्या पाच वर्षाच्या पहिल्या तिमाहीत होणाऱ्या कर संकलनाची आकडेवारी पाहता यंदाच्या वर्षी पहिल्या तिमाहीत कर संकलनात विक्रमी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये पहिल्या तिमाहीत १७१.८५ कोटी, २०२२-२३ मध्ये २५३.६५ कोटी, २०२३-२४ मध्ये ४५४, तर २०२४-२५ मध्ये पहिल्या तिमाहीत ४४० कोटी रुपयांची कर वसुली झाली होती. यंदा मात्र ३० जून २०२५ पर्यंत ५२२ कोटी ७२ लाखांची वसुली झाली आहे.
सवलतीचा लाभ घेतलेले मालमत्ताधारक (एकूण लाभार्थी संख्या)
महिला मालमत्ताधारक: १७,४५९
माजी सैनिक: ४०२३
दिव्यांग मालमत्ताधारक: १,८९७
शौर्यपदधारक: ९
पर्यावरणपूरक मालमत्ता: २४,८६९
आगाऊ भरणा : ४०,९३४
ऑनलाइन कर भरणा करणारे : ३,२३,२३९
एकूण लाभार्थी संख्या : ४,१२,४३०
विभाग कार्यालयानिहाय झालेले कर संकलन (कोटीमध्ये)
वाकड – ६५.११
थेरगाव – ४७.५२
चिखली – ३९.३५
कस्पटे वस्ती – ३७.६०
किवळे – ३४.२३
भोसरी – ३३.९५
चिंचवड – ३३.३
पिंपरी वाघेरे – ३२.८४
मोशी – ३०.५३
सांगवी – २७.९
मनपा भवन – २८.२२
आकुर्डी – २४.३३
फुगेवाडी दापोडी – १८.४९
चऱ्होली – १६.३७
निगडी प्राधिकरण – १२.७७
तळवडे – १२.९०
दिघी बोपखेल – १७.८४
पिंपरी नगर – ४. २४
७३ टक्के नागरिकांची ऑनलाइनला पसंती
महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देताना ३ लाख २३ हजार २३९ नागरिकांनी तब्बल ३८० कोटींपेक्षा जास्त कर ऑनलाइन पद्धतीने भरला आहे. ही संख्या जवळपास एकूण कर भरणाऱ्यांच्या तुलनेत ७३ टक्के आहे. पहिल्या तिमाहीत ऑनलाइनद्वारे ३८० कोटी ४८ लाख रुपये, रोख स्वरुपात ३० कोटी ६३ लाख, धनादेशाद्वारे २३ कोटी ६६ लाख आरटीजीएसद्वीरे २३ कोटी ५३ लाख रुपयांचा कर भरण्यात आला आहे.
कर संकलन विभागाने केलेले नियोजन, विविध माध्यमातून केलेली जनजागृती मोहिम, बचत गटांमार्फत घरोघरी पोहोचवण्यात आलेली मालमत्ता करांची बिले, कर संकलन विभागाच्या विविध सवलतींना नागरिकांना दिलेला प्रतिसाद या सर्वांमुळे यंदा आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत ५२२ कोटींचा कर वसुलीचा टप्पा पार झाला आहे. ही कामगिरी करण्यासाठी महत्त्वाचे योगदान असणाऱ्या करदात्यांसह सर्व विभागीय अधिकारी, कर्मचारी, बचत गटातील महिला यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
.





