म्हसवडमध्ये रात्रीत पाच घरफोड्या

रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी

म्हसवड – म्हसवड शहरात एकाच रात्रीत 5 ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात चोरीचे सत्र सुरु झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

सिध्दनाथ मंदिर परिसरातील भंडारे बोळासमोरील संदीप उर्फ गणेश विष्णुदास नामदास हे आपल्या कुंटुंबासह राहतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ते उकाड्यामुळे घराच्या टेरीसवर झोपत आहेत. दि. 30च्या मध्यरात्री चोरट्यांनी घराचा कोयंडा त्यांच्या आईचे व पत्नीचे 2 तोळ्यांचे गंठण व 1 हजार रुपये तर शर्टच्या खिशात असलेले पाचशे रुपये लंपास केले. याबाबतची फिर्याद नामदास यांनी पोलीसांत दिल्यावर पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.

या चोरीची माहिती घेत असतानाच याच परिसरातील रहिम काझी यांच्याही घरातही असाच प्रकार घडल्याचे समोर आले. तसेच नरसिंह पार परिसरातील तलाठी परदेशी यांच्या बंद घराचे कुलुप तोडून त्या घरातून अडीच तोळे सोन्याचे दागीन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दरम्यान, सणगर गल्ली येथेही चोरी झाली येथे माजी नगरसेवक मुगुटराव त्रिगुणे बंद घराचे कुलुप तोडुन घरातील अडीच तोळ्याचे गंठण अज्ञातांनी चोरुन नेले. याच परिसरात राहणारे मारुती गोंजारी यांच्याही घरातुन चोरट्यांनी किरकोळ रोकड लांबवली आहे.

एकाच रात्री शहरात 5 ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या सर्व चोऱ्या एकाच टोळीने घरांवर पाळत ठेवून केल्या असाव्यात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या चोरीसत्राला लगाम घालण्यासाठी पोलीस यंत्रणा यापुढे कोणती उपाययोजना राबवते हे काही दिवसात समजणार असले तरी यापुर्वी शहरात झालेल्या मोठ्या दरोड्याचा तपास लावण्यात अद्याप म्हसवड पोलीसांना यश आले नाही. निदान या चोरीचा तपास तरी म्हसवड पोलीस लावतील का असा संतप्त सवाल म्हसवडकर नागरिकांतून विचारला जात आहे.

पोलीस गस्त नावालाच

सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श अचारसंहिता सुरु आहे, त्यामुळे शहरात सर्वत्र पोलीसांची रात्रगस्त सुरु आहे असे असताना एकाच रात्रीत 5 ठिकाणी घरफोडी होते, याचा अर्थ नागरीकांनी काय समजावा असा उद्दीग्न सवाल सामान्य नागरीकांतून विचारला जात असुन पोलीस गस्त फक्त नावालाच आहे काय अशी विचारणा जनतेतून होत आहे.

चोरटे सीसीटीव्हीत कैद

म्हसवड शहरात एकाच रात्रीत 5 ठिकाणी घरफोडी करणारे 4 जणांचे टोळके असुन त्यांना मध्यरात्री नरसिंह पारावर झोपलेल्या काही युवकांना पाहिल्याचे समोर येत आहे, या परिसरात लावलेल्या सि.सि.टी.व्ही.मध्ये हे चोरटे चित्रीत झाले असल्याने या परिसरातील सि.सि.टी.व्ही. चे फुटेज तपासकामी महत्वाचे ठरणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.