नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर विधानसभा 2024 ची निवडणूक पंचरंगी होणार असल्याची शक्यता यावेळी वाढली आहे. राज्य पातळीवर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होताना दिसत असली तरी जुन्नर तालुक्यात मात्र आघाडी व युतीतील प्रत्येक पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही.
महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अतुल बेनके यांना अधिकृत उमेदवारी मिळाली असली तरी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शरद सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहे. तर भाजपाच्या आशा बुचके यांनीही थेट उमेदवारी अर्जदेखील भरला आहे.
महाविकास आघाडीकडून मूळचे काँग्रेसचे निष्ठावान व विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी काँग्रेच्या सचिवपदाचा राजीनाम देत राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.
आघाडीतील शिवसेना उबाठा गटाकडून तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांना उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे खंडागळे यांनी स्पष्ट केले असून सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले.
जुन्नर तालुक्यात सत्यशील शेरकर यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याने शिवसेनेच्या (उबाठा) कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेनेचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे काम करणार नसल्याचे निश्चित झाले आहे.
त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडी कडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आदिवासी नेते देवराम लांडे विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
शिवसेनेचे मोठे नुकसान
जुन्नर तालुक्यात यापूर्वी शिवसेनेचा दोनदा आमदार झाला आहे. तर इतर वेळी दुसर्या स्थानावर राहिलेल्या शिवसेनेची ताकद असूनही अधिकृत उमेदवार न दिल्याने त्याची मोठी किंमत शिवसेनेला चुकवावी लागेल. आजपर्यंत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना लढत झाली आहे.
परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत असल्याने भविष्यकाळात शिवसेनेला तालुक्यातील हक्काची जागा कायमची गमवावी लागेल.
लोकसभेच्या निवडणुकीत तालुक्यातील शिवसैनिकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना मदत केली होती; परंतु विधानसभेलाही शिवसेनेला उमेदवारी मिळणार नसेल तर आम्ही किती दिवस वाट बघायची असा प्रश्न शिवसैनिक विचारू लागले आहेत.
एकला चलो रे..
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके यांनी तालुक्यातील महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांचा अंदाज घेऊन जुन्नर विधानसभा निवडणुकीत ’एकला चलो रे’ या पद्धतीने जे बरोबर येतील त्यांना सोबत घेऊन आमदार म्हणून केलेल्या विकासकामांच्या जोरावर प्रचारात आघाडी घेतली आहे.
पंचरंगी लढतीचा फायदा कोणाला
जुन्नर तालुक्यात विधानसभा निवडणुकीत आमदार अतुल बेनके, सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, शरद सोनवणे, आशा बुचके अशी पंचरंगी लढत झाल्यास त्याचा फायदा विद्यमान आमदारांना अधिक होणार असल्याचे बोलले जात आहे.