पुणे शहरात दररोज साडेपाच हजार किलो कोविड कचरा

सार्वजनिक ठिकाणी पीपीई किट, मास्क, हॅंड ग्लोव्हज फेकण्याचे प्रमाण वाढले

– निमिष गोखले

पुणे – जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या 3 लाखांवर असून देशातील सर्वाधिक बाधित असणारा जिल्हा ठरला आहे. त्यातच शहरात दररोज सुमारे साडेपाच हजार किलो कोविड कचरा जमा होत असल्याने कोविड कचऱ्याचे आगर बनले आहे.

महिन्याकाठी पुण्यात तब्बल 1 लाख 65 हजार किलो कोविड कचरा (पीपीई किट, मास्क,आदी) गोळा होतो. याची योग्य विल्हेवाट लावणे अत्यावश्‍यक असतानाही काही रुग्णालये अन्य वैद्यकीय कचऱ्यातच तो मिसळतात. त्यामुळे आरोग्य कर्मचारीही धोक्‍यात येतात. रुग्णालयांनी हा कचरा पिवळ्या बॅगमध्ये भरणे बंधनकारक असून अनेक रुग्णालये हा नियम पाळत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील तळोजा येथील कोविड डिस्पोजल प्लांटमध्ये पुण्यातील हा कचरा पाठविण्यात येतो. त्याच्या विल्हेवाटाची पुण्यात सोय नाही. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी पीपीई किट, मास्क, हॅंड ग्लोव्हज फेकण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. हा कचरा शहराबाहेरील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडल्याचे धक्‍कादायक चित्र आहे. हा कचरा पालिका उचलते. मात्र, यामुळे करोनाचा फैलाव होऊ शकतो. दरम्यान, महाराष्ट्रात दररोज सुमारे 40 हजार किलो कोविड कचरा जमा होत आहे.

असा गोळा करतात कोविड कचरा
पालिकेकडून जीपीआरएस असणाऱ्या वाहनांमधून कोविड कचरा शहरातील कलेक्‍शन सेंटर्समधून गोळा केला जातो. मोठ्या रुग्णालयांमध्ये जाऊन कोविड कचरा उचलला जातो. तर 10 बेड्‌सपेक्षा कमी क्षमता असणाऱ्या लहान रुग्णालयांनी हा कचरा जमा झाल्यानंतर पालिकेला कळवल्यानंतर तो उचलला जातो. पिवळ्या बॅगमधील हा कोविड कचरा तळोजा येथे जाळून टाकण्याकरिता (विल्हेवाट) पाठविला जातो. तर लाल व पांढऱ्या बॅगमधील कचरा रांजणगाव येथील प्लांटमध्ये विल्हेवाटीसाठी पाठविला जातो.

शहरात कोविड कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकताना आढळल्यास 5 हजार रुपयांच्या दंडांची तरतूद आहे, आतापर्यंत काही जणांना दंड ठोठावण्यात आला असून गरज पडल्यास कारवाईचे स्वरूप आणखी तीव्र करू
– विलास कानडे, सहमनपा आयुक्त

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.