Crime News : करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी 72 तासांत जेरबंद; दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग निष्पन्न
Crime News : याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियम कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्हावरे : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड फायर करुन.जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या ७२ तासांच्या आत अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. सुपा (ता. पारनेर) बसस्थानक परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत शिरुर पोलिसांच्या डीबी पथकाने दमदार कामगिरी केली आहे.
करडे गावच्या हद्दीत हनुमान मंदिराच्या पाठीमागे, भैरवनाथ मंदिराजवळील स्मशानभूमीशेजारी असलेल्या तळ्याजवळ १८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १:३० वाजता हि घटना घडली होती. आरोपी आदित्य लंघे, बबलू सोनलकर, टिन्या शेळके, दाद्या उर्फ रोहन पंचमुख व अन्य तीन ते चार जणांनी बेकायदा जमाव जमवून फिर्यादी निखिल सतीश थेऊरकर (वय २३) रा. करडे, दौडे वस्ती याला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने पिस्तुलातून तीन राउंड फायर करण्यात आले.
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियम कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने स्वतंत्र तपास पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना आरोपी सुपा बसस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ आणि सचिन भोई यांच्या पथकाने सापळा रचला.
या कारवाईत अथर्व उर्फ टिन्या रावसाहेब शेळके (वय १९), रोहन उर्फ दाद्या पंचमुख (वय १९) दोघेही (रा. रांजणगाव गणपती), आदित्य दशरथ लंघे (वय १९, रा. करडे) निखिल विलास कायस्थ (वय १९) आणि सनी परमेश्वर मस्के (वय २०) दोघेही (रा. कारेगाव) यांना शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना आज (दि २१) जुलै २०२६ रोजी पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अथर्व उर्फ टिन्या शेळके आणि रोहन उर्फ दाद्या पंचमुख हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणी, अवैध हत्यार बाळगणे, बेकायदा जमाव आणि मारहाणीचे एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी निखिल थेऊरकर याच्या विरुद्धही शिरुर, रांजणगाव एमआयडीसी आणि परभणी पोलीस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्र आणि गंभीर मारहाणीचे पाच गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पुर्वीच्या मारहाणीच्या रागातून गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, राकेश मुळीक, पोलीस हवालदार अक्षय कळमकर, शरद वारे, राहुल भवर तसेच पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखिल रावडे, अंबादास थोरे, रविंद्र काळे, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांच्या पथकाने केली. या घटनेचा पुढील अधिक तपास शिरुरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील हे करत आहेत.





