नवी दिल्ली – अमेरिकेने भारतीय समुद्री खाद्य क्षेत्रावर 50 टक्के आयत शुल्क लावले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेला माशांची होणारी निर्यात कमी झाली आहे. मात्र निर्यातदारांनी इतर पर्याय शोधले आहेत. निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय माशांची निर्यात असतात चीन, व्हिएतनामम, रशिया, कॅनडा आणि ब्रिटनला वाढली आहे. या माहितीला वाणिज्य मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. अमेरिकेने आयात शुल्क लावल्यामुळे अमेरिकेत जाणारी निर्यात महागात पडत आहे. त्यामुळे अमेरिकन आयातदार इतर स्त्रोतातून आयात करीत आहेत. भारतातून अमेरिकेला सर्वात जास्त कोळंबीची निर्यात होत होती. मात्र आता ही निर्यात 7.43 टक्क्यांनी कमी होऊन 85.47 दशलक्ष डॉलर झाली आहे. अधिकार्यांनी सांगितले की, वाणिज्य मंत्रालयाने आणि निर्यातदारांनी यासंदर्भात अगोदरच तयारी केली होती. त्यामुळे चीन, व्हिएतनाम, बेल्जियम, जपान, रशिया, कॅनडा आणि ब्रिटनबरोबर संपर्क प्रस्थापित करून भारताने संबंधित देशांना माशांची निर्यात वाढविली आहे. या देशांना भारतातून आलेले मासे स्वस्त पडतात. त्याचबरोबर ते दर्जेदार असतात. अगोदर हे मासे अमेरिकेला जात होते. आता एकूण बदललेली परिस्थिती पाहता इतर देश भारताकडून मासे आयातीला प्राधान्य देत असल्याचे सांगण्यात आले. या कालावधीत म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये चीनला होणारी निर्यात 24 टक्क्यांनी वाढून 568 दशलक्ष डॉलर झाली आहे. तर व्हिएतनामला होणारी निर्यात 123 टक्क्यांनी वाढून 261 दशलक्ष डॉलर इतकी झाली आहे. निर्यातदारानी सांगितले की, या कालावधीत बेल्जियमला निर्यात 94 टक्क्यांनी, जपानला होणारी निर्यात 10 टक्क्यांनी, रशियाला होणारी निर्यात 49टक्क्यांनी, कॅनडाला होणारी निर्यात 13टक्क्यांनी, ब्रिटनला होणारे निर्यात 28 टक्क्यांनी वाढली आहे. अर्थातच या कालावधीत भारताची एकूण माशांची निर्यात 17 टक्क्यांनी वाढवून 3.10 अब्ज डॉलरवर गेली आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या निर्णयाचा प्रभाव कमी करण्यास मदत झाली आहे.