आधी कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं नंतर म्हणाले…; महायुतीमधील बड्या मंत्र्याचं धक्कादायक विधान

Narahari Jirwal : मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटचा जीआर राज्य सरकाराने काढला. यानंतर कुणबी दाखले देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आज १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम या दिवसाचे औचित्य साधत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. मात्र, महायुती सरकारमधील मंत्री आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.
सरकारने दिलेले हे प्रमाणपत्र न्यायालयात टिकेल की नाही, याबाबत झिरवळ यांनी संशय व्यक्त केल आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठी चर्चा आता सुरू झाली आहे. झिरवळ यांच्या हस्ते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केलं आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा निर्णय लागू केल्यानंतर मराठवाड्यातील मराठा बांधवांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलं.
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. यावरही झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्यायचे किंवा नाही हे कायदा ठरवेल. कारण संविधानात आणि हैदराबाद गॅझेटमध्ये काय आहे, हे तपासावे लागेल. आदिवासी समाज संविधानात असून प्रत्येक समाजाने शांततेने आंदोलन करायला पाहिजेत, असं झिरवळ म्हणाले.
मराठावाडा मुक्ती संग्रामच्या कार्यक्रमात मराठा बांधवांना कुणबी जातीचे दाखले वाटप करण्यात आले. दाखले मिळाल्यानंतर मराठा बांधवांनी आजचा दिवस दिवाळी सणासारखा असल्याची भावना झिरवळ यांनी व्यक्त केली. मराठावाडा मुक्तीसंग्रामाच्या दिनाचे औचित्य साधत बीड, धाराशीव, लातूर, संभाजीनगरसह हिंगोली, परभणीमध्ये मराठा समाजातील बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र त्यांच्या भाषणावेळी काही जणांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचं सांगत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा : स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञाताने फेकला लाल रंग; शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप





