“आधी राज ठाकरेंनी संभाजी महाराजांविषयीच्या ‘त्या’ विधानाबद्दल नाक घासून माफी मागावी”

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आपल्या बहुचर्चित सभेसाठी औरंगाबादला निघाले आहेत. तत्पूर्वी ते पुण्यात आले. पुण्याहून औरंगाबादला जाताना वढू तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराच यांच्या समाधीस्थळी जावून त्यांनी दर्शन घेतल. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी राजे यांच्याविषयी एक विधान केलं होतं. तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या व्हिडीओवरूनच सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या वढू तुळापूरला जाण्यावर टीका करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविकांत वरपे यांनी टीका केली आहे.
राज ठाकरे म्हणाले होती की, संभाजीराजे वडिलांशी (छ. शिवाजी महाराज) भांडून मोघलांना जाऊन मिळाले होते. ज्यांच्याविरोधात लढण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची हयात गेली त्यांनाच संभाजीराजे जाऊन मिळाले होते. महापालिका निवडणुकांसाठी मनसेने मुंबईत उभारलेल्या वॉर रूमच्या उद्घाटनावेळी राज ठाकरेंनी हे विधान केलं होतं. त्याचवेळी त्यांनी राम गणेश गडकरी पुतळ्यासंदर्भातल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावरून मराठा संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत वरपे यांनी व्हिडीओ शेअर करून राज ठाकरेंकडे संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी पूर्वी केलेल्या विधानाबाबत नाक घासून जनतेची आणि महाराष्ट्राची माफी मागा, अशी मागणी केली आहे.





