‘100 हून अधिक दहशतवादी मारले, ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी’; DGMO राजीव घई यांची माहिती

नवी दिल्ली : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करत १०० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. रविवारी संध्याकाळी तिन्ही सैन्यदलांच्या लष्करी संचालकांनी (DGMO) आयोजित पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी या ऑपरेशनची सविस्तर माहिती देत पाकिस्तानला कठोर इशारा दिला. “आमचा एकमेव उद्देश दहशतवादी नेटवर्क नष्ट करणे हा होता,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील (PoK) नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य केले. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे निवडलेल्या या तळांमध्ये लष्कर-ए-तयबाचा मुरीदके येथील तळ आणि पंजाब प्रांतातील जैश-ए-मोहम्मदचा बहावलपूर येथील मुख्यालयाचा समावेश होता. या हल्ल्यांमध्ये यूसुफ अजहर, अब्दुल मलिक रऊफ आणि मुदासिर अहमद यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा झाला, जे १९९९ च्या IC-814 विमान अपहरण आणि २०१९ च्या पुलवामा हल्ल्याशी संबंधित होते. DGMO घई यांनी सांगितले की, भारतीय वायुसेनेने या हल्ल्यांमध्ये मोलाची भूमिका बजावली, तर नौदलाने अचूक शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला.
या ऑपरेशननंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले आणि नागरी वस्त्या, गावे तसेच गुरुद्वाऱ्यांसारख्या धार्मिक स्थळांवर हल्ले केले, ज्यामुळे अनेक नागरिकांचा बळी गेला. “पाकिस्तानची ही घबराट आणि अनियंत्रित प्रतिक्रिया त्यांच्या पराभवाची साक्ष आहे,” असे घई यांनी नमूद केले.
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे काय?
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्याच्या बदल्यासाठी भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या ऑपरेशनद्वारे ७ मे रोजी २५ मिनिटांत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले की, या हल्ल्यांत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले, ज्यामुळे अनेक जुन्या हल्ल्यांचा हिशेब चुकता झाला.
पाकिस्तानला इशारा –
DGMO घई यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, भारताचा हा हल्ला केवळ दहशतवाद्यांविरुद्ध होता, पाकिस्तानच्या लष्करी तळांवर नाही. तरीही, पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्यास भारत कठोर प्रत्युत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला. भारतीय सैन्याच्या या यशस्वी कारवाईने देशाचे मनोबल उंचावले असून, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताची ठाम भूमिका पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
ही ब्रेकिंग बातमी आहे, बातमी अपडेट होत आहे…





