Baramati News : बारामती नगरपरिषदेचा प्रथम क्रमांक; माझी वसुंधरा अभियान ५.० : अजितदादांना अभिप्रेत कामगिरी
Baramati News : पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बारामती नगरपरिषदेचा सन्मान “माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्या”त करण्यात येणार आहे.

बारामती : “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत भूमी, जल, वायु, अग्नी व आकाश या पंचतत्त्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ४० हजार ते १ लाख लोकसंख्या गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत बारामती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, अजितदादा पवार यांना अभिप्रेत असलेली कामगिरी नगरपरिषदेने केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती नगर परिषदेचे अभिनंदन केले आहे.
पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बारामती नगरपरिषदेचा सन्मान “माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्या”त करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा शनिवार (दि.२१) रोजी दुपारी १२ वाजता डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री (नगर विकास), उपमुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क), मंत्री (पर्यावरण व वातावरणीय बदल) तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष श्वेता योगेश नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे, सभापती, गटनेते, नगरसेवक व नगरसेविका यांनी शहरातील नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. (स्व) अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करीत २०२६ मधील स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशपातळीवर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. बारामती शहरातील नागरिकांना अधिक भरीव योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
नगरपरिषदेचे हे यश दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे फलित आहे. त्यांच्या प्रेरणेने नगरपरिषद प्रशासनाने पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाच्या दिशेने भरीव कामगिरी केली आहे. बारामती शहराच्या पर्यावरणपूरक वाटचालीत नागरिकांनी यापुढेही सक्रिय सहभाग नोंदवावा.
– सचिन सातव, नगराध्यक्ष बारामती, नगरपरिषद.





