पुणे – तळेगाव दाभाडे येथील टीजीएच-ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये राज्यातील पहिले “पेट-सीटी स्कॅन’ मशिन बसविण्यात आले आहे. जी. ई. कंपनीचे हे अत्याधुनिक मशिन असून, त्यामध्ये 16-स्लाईस सिटी स्कॅनची सुविधा आहे. त्यामुळे कर्करोगाचे निदान आणि संपूर्ण शरिराचे पेट सीटी स्कॅन अवघ्या दहा मिनिटांमध्ये करता येणे शक्य आहे, असे ऑन्को-लाईफ ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे अध्यक्ष उदय देशमुख यांनी सांगितले.
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये, रोगाच्या प्रारंभिक स्टेजसाठी पेट-सीटी स्कॅन आवश्यक आहे. या मशिनद्वारे कर्करोगाची लागण झालेल्या आणि कर्करोग नसलेल्या रुग्णांचे संपूर्ण शरीर 10 मिनिटांपेक्षा कमी वेळात स्कॅन केले जाऊ शकते. त्यामुळे केमोथेरपी, रेडिएशन थेरपी किंवा शस्त्रक्रिया यांसारख्या योग्य उपचारांची निवड चांगल्या परिणामासाठी होऊ शकेल. केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांमध्ये पेट-सीटी स्कॅनची पुनरावृत्ती केली जाऊ शकते, जेणेकरून उपचार प्रभावी आहेत की नाही याचे मूल्यांकन करता येणे शक्य आहे. केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी पूर्ण झाल्यावर फॉलोअप पेट-सीटी स्कॅन केला जाऊ शकतो.
याबाबत अधिक माहिती देताना पेट-सीटी विभागाचे प्रमुख डॉ. हसमुखकुमार जैन म्हणाले, काही महिने किंवा वर्षानंतर फॉलो-अप करण्याच्या उद्देशाने पेट-सीटी स्कॅन महत्वाचे आहे. कर्करोग नसलेल्या रुग्णांमध्ये देखील पेट-सीटी स्कॅन महत्त्वाचे आहे. त्यामध्ये नवजात शिशू मधील सेरेब्रल पाल्सीसारखे विकृत मेंदूचे रोग, तसेच अल्झायमर्स रोग, पार्किनसन्स रोग इत्यादी आजाराच्या रूग्णांमध्ये मेंदूच्या कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी पेट-सिटी स्कॅनचा वापर केला जाऊ शकते.
गामा कॅमेरा मशिनवर केलेले न्यूक्लियर कार्डिएक स्कॅन तसेच पेट-सिटी मशिनवर केलेले कार्डिएक पेट स्कॅन करून रक्तपुरवठ्यासह हृदयाच्या कार्याची स्थिती मूल्यांकन करण्यासाठी आणि कोणत्याही इंटरवेन्शनल कार्डिएक प्रक्रियेमुळे रुग्णाला मदत होईल की नाही याचा अंदाज येतो. दरम्यान, तापाचे कारण न समजल्यास रुग्णांमध्ये पेट-सीटी स्कॅनद्वारे संपूर्ण शरीरात कोठे संसर्ग झाला आहे ते देखील ओळखले जाऊ शकते, असे डॉ. जैन यांनी सांगितले.