पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे देशात प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद (एनएसआरटीसी) विकसित भारत- २०४७ आयोजित करण्यात येत आहे. १९ ते २१ जुलै या कालावधीत ही परिषद एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये संपन्न होणार आहे.
याबाबतची माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि एनएसआरटीसीचे राष्ट्रीय संयोजक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परिषदेचे उद्घाटन १९ जुलै रोजी एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये सायंकाळी ४ वाजता होईल. या वेळी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय डॉ. जितेंद्र सिंग हे मुख्य अतिथी असतील.
डीएसआयआरचे महासंचालक व सचिव डॉ. सौ. एन. कलई सेल्वी, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे, मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉ. गणपती यादव आणि मद्रास आयआयटीचे प्रा. टी. प्रदीप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या परिषदेच्या निमित्ताने १३० शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या विषयांवर केलेल्या संशोधनाच्या गोषवाऱ्याचे (अॅबस्ट्रॅक बुक) पुस्तक प्रकाशन करण्यात येईल. या गोलमेज परिषदेचे समाजमाध्यमांवरून थेट प्रसारण केले जाणार आहे.