१८ हजार ४६५ मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण

नगर – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयडीसी येथील वखार महामंडळात एक महिन्यापासून सुरु असलेली विधानसभा मतदारसंघनिहाय १८ हजार ४६५ मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ३९९ मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आल्या आहेत.
लोकसभाच्या निकालानंतर डॉ. सुजय विखे-पाटील यांनी नगर लोकसभा मतदारसंघातील ४० मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांच्या पडताळणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नगर लोकसभा मतदारसंघात वापरलेली मतदान यंत्रे वखार महामंडळातील गोदामात सील केलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्र आणि इतर जिल्ह्यातून मागवलेल्या मशीनची तपासणी करण्यात आली.
निवडणूक आयोगाने १२ अभियंत्यामार्फत मतदान यंत्रांची तपासणीसाठी ४० दिवसांचा कालावधी निश्चित केला होता. परंतु आणखी ६वाढीव अभियंत्यांची नियुक्त केल्याने १० दिवस अगोदरच मतदान यंत्राची तपासणी पूर्ण झाली. यामध्ये बॅलेट युनिट ८ हजार ५३१, कंट्रोल युनिट ४ हजार ७७९ आणि व्हीव्हीपॅट ५ हजार १५५ अशा एकूण १८ हजार ४६५ मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण झाली.
या जिल्ह्यातून मागविल्या मशिन
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १२ मतदारसंघात बीयू ८ हजार ५५०, सीयू ४ हजार ७८२ आणि ५ हजार १६३ व्हीव्हीपॅट मशीनची आवश्यकता आहे. नगर लोकसभा मतदारसंघातील मशीन सील असल्याने बीडमधून २ हजार १० व्हीव्हीपॅट, जालना ५७० बीयू, ७२० सीयू, ५०० व्हीव्हीपॅट आणि नाशिक २ हजार ७९३ बीयू, १ हजार २८४ सीयू, १ हजार ३५८ व्हीव्हीपॅट मशीन मागवल्या होत्या.





