- जवानांसाठी ऑक्सिजन प्लान्ट उभारल्यानंतर आता वीरपत्नींसाठी निवासस्थान
पिंपरी –
“भारतीय नागरिकाचा
घास रोज अडतो ओठी,
सैनिकहो तुमच्यासाठी…’
या प्रसिद्ध गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या गीताप्रमाणे आम्हाला भारतीय सीमेच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणाऱ्या सैनिकांविषयी आपुलकी असते. मात्र, प्रत्यक्ष त्यांच्यासाठी काम करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पुण्यातील सुमेधा व योगेश चिथडे या दांपत्यांचा त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल. जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी असलेल्या सियाचीन येथे भारतीय जवानांसाठी ऑक्सिजन प्लांन्ट उभारल्यानंतर त्यांनी आता जवानांच्या वीर पत्नींसाठी निवासस्थान उभारण्याची योजना हाती घेतली आहे.
सियाचिन ही जगातील सर्वांत उंच युद्धभूमी आहे. आपण सहजपणे श्वास घेतो. मात्र, सियाचिनला श्वास घेता येणे ही देखील चैनीची बाब म्हणावी लागेल. सियाचिन येथे तैनात असलेल्या सैनिकांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा, यासाठी लष्करातर्फे ऑक्सिजन तयार करण्याची यंत्रणा उभारण्यात येणार होती. या प्रकल्पासाठी दोन कोटींहून आधिक रक्कम लागणार होती. ही रक्कम सरकारने उभारावी, अशी सर्वसामान्य अपेक्षा असते.
मात्र, भारतीय नागरिक म्हणून सैनिकांसाठी आपले योगदान असावे, या भावनेतून चिथडे दांपत्याने सोल्जर्स इंडिपेडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन (सेफ) या संस्थेच्या माध्यमातून निधी उभारला. 4 ऑक्टोंबर 2019 ला या ऑक्सिजन जनरेशन प्लांन्टचे काम पूर्ण झाले. या प्लांन्टच्या माध्यमातून सध्या सियाचीन येथे तैनात असलेले सैनिक, स्थानिक नागरिक यांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत आहेत.
..आणि त्यांनी मोडले दागिनेही
सैनिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांन्टसाठी पुण्यातील रेणुकास्वरूप प्रशालेत शिक्षिका असलेल्या सुमेधा चिथडे यांनी सुरवातीला स्वत:चे दागिने मोडून सव्वा लाख रुपयांचा निधी उभा केला. त्यानंतर “सेफ’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लोकवर्गणी जमा केली. त्यातूनच सियाचीनला जवानांसाठी ऑक्सिजन प्लांन्टचे काम पूर्ण केले. आता या दांपत्याने वीर जवानांच्या पत्नींसाठी निवासस्थान उभारण्याची योजना हाती घेतली आहे. त्यासाठी आवश्यक जागा व निवासस्थान उभारण्यासाठी त्यांनी निधीची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक आर्थिक मदतीसाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. संपर्क : 9764294291/9764294292.
जवानांची दिवाळी होते गोड
देशाच्या रक्षणासाठी तळहातावर प्राण घेऊन लढणाऱ्या जवानांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने “सेफ’ या संस्थेच्या माध्यमातून 1999 पासून दरवर्षी जवानांना दिवाळीचा फराळ पोहच केला जातो. यंदाही आम्ही जवानांसाठी दिवाळीचा फराळ पाठविला आहे, अशी माहिती योगेश चिथडे यांनी दिली.