Firing In School : ऑस्ट्रियातल्या शाळेत गोळीबार; 9 जणांचा मृत्यू

व्हिएन्ना, (ऑस्ट्रिया) : ऑस्ट्रियातल्या एका शाळेमध्ये झालेल्या गोळीबारात 9 जण ठार झाले आहेत. ग्राझ नावाच्या शहरात आज ही घटना घडली. या गोळीबारातील प्रमुख संशयित देखील ठार झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा गोळीबार एकट्या हल्लेखोराने केला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गोळीबारात या हल्लेखोरासह एकूण १० जण ठार झाले आणि काही जण गंभीर जखमी झालेअसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
ही एक भयानक घटना असल्याचे ग्राझ शहराचे महापौर एल्क कार्ह यांनी म्हटले आहे. या गोळीबारात मरण पावलेल्यांमध्ये शाळेतील विद्यार्थी एका प्रौढ व्यक्तीचाही समावेश असल्याचे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या हल्ल्याच्या सूत्रधाराबद्दल अधिकाऱ्यांनी त्वरित कोणताही तपशील जाहीर केला नाही. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता या गोळीबाराबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर ग्राझच्या ऐतिहासिक केंद्रापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोर्ग ड्रेयर्सच्झेंगासे हायस्कूलमध्ये विशेष दलांचा समावेश असलेले पोलिसांचे पथक पाठवण्यात आले.
सकाळी ११.३० वाजता शाळा रिकामी करण्यात आली. शाळेतील सर्वांना एका मिटींग रुममध्ये एकत्र आणण्यात आले. परिस्थिती आता सुरक्षित असल्याचे तेथे सांगण्यात आले. तातडीच्या हालचालींसाठी एक हेलिकॉप्टर देखील सज्ज ठेवण्यात आले होते. तसेच पोलिसांच्या वाहनांचा ताफा शाळेभोवती जमा झाला असल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हा गोळीबार करण्यामागील हेतू स्पष्ट होऊ शकलेला नाही. ग्राझ हे देशाच्या आग्नेयेला असलेले ऑस्ट्रियातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे आणि येथे सुमारे ३ लाख लोक राहतात.





