हिंगोली : हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे जुन्या शेतीच्या वादातून मंगळवारी (दि. 23) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबारात बापलेक ठार, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडलीक जगताप आणि बाबाराव जगताप यांच्यात शेतीच्या कारणावरून जुना वाद होता. मंगळवारी रात्री कुंडलीक हे मुलगा शिवराज जगताप (29), सुभाष कुरवाडे आणि बालाजी जगताप यांच्यासह बाबाराव यांच्या घरी गेले. दरवाजा वाजवताच बाबाराव यांनी बंदुकीतून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात कुंडलीक यांना तीन गोळ्या, तर शिवराज यांच्या छातीला गोळी लागली, ज्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. सुभाष आणि बालाजी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळ गाठले. बाबाराव जगताप, विठ्ठल जगताप आणि ज्ञानेश्वर जगताप यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.