दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वाखारी येथील अंबिका कला केंद्रात २१ जुलै २०२५ रोजी रात्री १०:३० ते ११:३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, पोलिसांवर सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यवत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, अंबिका कला केंद्राचे मॅनेजर बाबासाहेब राजश्री अंधारे (वय ३८) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै रोजी रात्री बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती कला केंद्रात आले. त्यांनी दोन पार्टी बुक केल्यानंतर रात्री १०:३० वाजता तिसरी पार्टी आयोजित केली, ज्यात पाच महिला उपस्थित होत्या. या पार्टीदरम्यान बाळासाहेब मांडेकर याने नाचताना बंदूक काढून हवेत गोळीबार केला. गोळी भिंतीला आणि छताला लागली, तर फरशीवर गोळीचा चपटा तुकडा आढळला, जो फिर्यादीने पोलिसांना सादर केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणतीही जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद नाही. मात्र, आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटद्वारे या गोळीबारात एक तरुणी जखमी झाल्याचा दावा केला आहे. घटनास्थळावर भिंतीवर आणि छतावर गोळी लागल्याचे ठसे आढळले असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरून या घटनेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, “दौंडमध्ये एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने कला केंद्रात गोळीबार करत राडा केला. पोलिस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. दोषींवर कारवाई होणार की सत्ताधारी म्हणून मोकाट सोडणार? कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी.” या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्याचे दबाव वाढत आहे. पोलिस यंत्रणा या प्रकरणात कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.