Hadapsar: हडपसर भागातील राममनोहर लाेहिया उद्यानाजवळ असलेल्या मजुरांच्या वसाहतीत शनिवारी मध्यरात्री आग लागली. आगीत १९ झोपड्या, तसेच तीन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्यानंतर मजूर, तसेच कुटुंबीय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही. पुणे-सोलापूर रस्त्यावर राममनोहर लोहिया उद्याना आहे. उद्यानाच्या मागील बाजूस मजुरांची वसाहत आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास वसाहतीतील एका झोपडीला आग लागली. झोपड्या तात्पुरत्या स्वरुपात बांबू आणि पत्र्याचा वापर करुन बांधण्यात आल्या आहेत. गृहोपयोगी साहित्याने पेट घेतल्यानंतर आग भडकली. आग भडकल्यानंतर शेजारी असलेल्या झोपड्यांनी पेट घेतला. आग लागताच वसाहतीतील मजूर आणि कुटुंबीय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग भढकल्याने जवानांनी चहुबाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीत १९ झोपड्या भस्मसात झाल्या, तसेच तीन दुचाकीही जळल्या. आगीत कपडे, धान्य, तसेच अन्य साहित्य जळाले. मध्यरात्री आग लागल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, प्रसंंगावधान राखून मजूर आणि कुटुंबीय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे, विलास दडस यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. हेही वाचा : Neal Katyal: अमेरिकन न्यायालयात ट्रम्पच्या विरोधात भक्कमपणे बाजू मांडणारे कोण आहेत नील कात्याल? ; वाचा सविस्तर