Kolhapur News : कोल्हापुरातल्या राजाराम कारखान्याला लागली आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

कोल्हापूर : कोल्हापूर येथील राजाराम कारखान्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 5 ते 6 बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारखान्यात एका ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी उडली आणि ती भडकल्याने आगीने काही काळ रौद्र रूप धारण केले. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत असल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 10:40 च्या सुमारास कारखान्याच्या मिलला आग लागली. यामध्ये तीन सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोनच दिवसांपूर्वी कारखान्याचा गळीत हंगाम संपला होता. मात्र, या आगीत मोठे नुकसान झाले. राजाराम कारखान्यावर महाडिक गटाची सत्ता असून कोल्हापूर दक्षिणचे भाजप आमदार अमल महाडिक अध्यक्ष आहेत. राजकीय संघर्षामुळे हा कारखाना नेहमीच चर्चेत राहिला आहे. हंगाम संपल्यानंतर कारखान्यातील मशीन्सची साफसफाई करताना आग लागली. कारखान्यात खाली पडलेल्या ऑइलला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशमन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न करत आग विझवण्यात यश आले आहे.
भायखळ्यात इमारतीला आग
मुंबईतील भायखळ्यातील इमारतीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. भायखळा पूर्वेतील न्यू ग्रेड इन्स्टा मिलजवळील सॅलसेट इमारतीला सकाळी 10.45 वाजता आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचेही वृत्त नाही.





