Fire Bike : ‘फायर बाइक’च उभीच; लाखोंची यंत्रणा धूळखात; अरुंद गल्ली-बोळांसाठी होती खास व्यवस्था
Fire Bike : प्रशिक्षित मनुष्यबळ आणि देखभालीअभावी वापराविना

पिंपरी – आगीच्या घटनांमध्ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. विशेषतः अरुंद गल्ली-बोळात अग्निशमन बंब पोहोचणे कठीण होते. ही अडचण दूर करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागात सहा ‘फायर बाइक’ दाखल करण्यात आली. मात्र, हीच बाइक सध्या वापराविना उभी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून उभारलेली ही सुविधा प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत कितपत उपयोगी पडते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरातील पिंपरी, चिंचवडेनगर, काळेवाडी, थेरगाव, सांगवी, भोसरी गावठाण, खराळवाडी आणि विविध कामगार वस्त्यांमध्ये अरुंद रस्ते आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्याही असते. आग लागल्यानंतर मोठा अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागू शकतो. अशा वेळी सुरुवातीच्या काही मिनिटांत मदत करण्यासाठी फायर बाइक महत्त्वाची ठरू शकते.
अत्याधुनिक यंत्रणा, मात्र वापर मर्यादित
या बाइकवर वॉटर मिस्ट सिस्टीम बसविण्यात आली आहे. सुमारे ६० लिटर क्षमतेची पाण्याची व्यवस्था आहे. केमिकल आणि ऑइल आगीसाठी फोमची सुविधाही आहे. प्राथमिक बचावासाठी आवश्यक उपकरणेही देण्यात आली आहेत. मात्र, ही यंत्रणा हाताळण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. प्रशिक्षणाचा अभाव असल्याने बाइकचा नियमित वापर सुरू होऊ शकला नसल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.
देखभालीचा मुद्दाही ऐरणीवर
बाइक दीर्घकाळ वापराविना उभी राहिल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळोवेळी तपासणी आणि देखभाल करणे आवश्यक आहे. आपत्कालीन कॉल मिळाल्यानंतर बाइक तातडीने रवाना करण्याची कार्यपद्धतीही प्रभावी असणे गरजेचे आहे. शहरातील दाट वस्त्यांमध्ये आगीच्या घटना घडल्यास पहिल्या काही मिनिटांत नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे फायर बाइक प्रत्यक्ष सेवेत दाखल झाल्यापासून कधी पूर्ण क्षमतेने तिचा वापर होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांची संख्या आणि प्रशिक्षणाच्या अडचणींमुळे बाइकचा नियमित वापर सुरू करता आला नव्हता. आता प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरू करण्याची नितांत आवश्यकता आहे. आवश्यक तांत्रिक दुरुस्ती करून फायर बाइक लवकरच प्रत्यक्ष सेवेत आणली जाईल, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
‘अग्निशामक विभागासाठी आणलेल्या बाइकचा उपयोग होत नाही. या दुचाकी पायलट म्हणून वापर करता येऊ शकतो. गणेश विसर्जन दिवाळीच्या दरम्यान थंडीच्या दिवसांमध्ये पेट्रोलिंग करिता बुलेटचा सुद्धा वापर केला जातो. त्यामुळे त्यात आणखी काही बदल करता येईल का, याबाबत कार्यशाळा विभाग आणि आरटीओशी चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा फक्त प्राथमिक स्तरावर आहे.’- व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, अग्निशामक विभाग.
अग्निशामक दलातील फायर बुलेटचे दहा उपयोग
- अरुंद गल्ल्यांमधील आगीवर तातडीने नियंत्रण मिळवणे.
- गर्दीच्या वस्त्यांमध्ये अग्निशमनासाठी जलद पोहोचणे.
- वाहनांना पोहोचणे कठीण असलेल्या ठिकाणी आग विझवणे.
- लहान दुकानांमधील आगीवर त्वरित पाण्याचा मारा करणे.
- झोपडपट्ट्यांमधील आगीचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने मदत करणे.
- दुचाकी, चारचाकी वाहनांना लागलेली आग विझवणे.
- औद्योगिक परिसरातील प्राथमिक आगीवर तातडीने नियंत्रण मिळवणे.
- बाजारपेठांमधील अरुंद रस्त्यांतून अग्निशमन सेवा पुरवणे.
- मोठ्या अग्निशमन वाहनांना अडथळा असलेल्या ठिकाणी मदत करणे.
- मुख्य अग्निशमन वाहन येईपर्यंत प्राथमिक उपाययोजना करणे.





