खडकवासला – सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्याची अवस्था बिकट झाली असून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वारंवार तक्रार व आंदोलने करूनही संबंधित यंत्रणा व अधिकारी याकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे चक्क या रस्त्यावरच हवेली पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात नांदोशी, वांजळवाडी गावाचे रहिवासी मारुती गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. त्याची एक प्रत राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव आणि हवेली पोलीस यांना ई-मेलद्वारे पाठवली आहे. या तक्रारीमध्ये मारुती गायकवाड यांनी सदरचा रस्ता त्यांना गेल्या 30 वर्षांपासून त्रास देत असून मानसिक व शारीरिक छळ करत आह. तसेच या रस्त्यामुळे आतापर्यंत त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय असून नागरिकांच्या जीवितास धोका आहे. सिमेंटच्या रस्त्याला तर दुभाजक नाहीत, शिवाय साइडपट्टी तसेच पाणी वाहून जाण्यासाठी गटारेदेखील बांधलेली नाहीत,’ असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. “सार्वजनिक बांधकाम खात्याचे संबंधित अधिकारी या समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने शेवटी रत्याच्याच नावे पोलिसांत तक्रार करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा पवित्रा घ्यावा लागला आहे. मात्र, या सर्व बाबीस संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत,’ असे गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे.