फिनटेक कंपन्यांची स्पर्धा आयोगाकडून चौकशी

नवी दिल्ली – देशातील कंपन्यांनी स्पर्धेसाठीच्या योग्य वातावरणात काम करावे यासाठी नेमण्यात आलेल्या भारतीय स्पर्धा आयोगाने काही फिनटेक कंपन्यांची चौकशी करीत असल्याचे सांगितले आहे. स्पर्धा आयोगाच्या प्रमुख रवनीत कौर यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, या कंपन्या तंत्रज्ञानाचा स्पर्धाविरोधी उपयोग तर करत नाहीत ना या संदर्भात ही चौकशी सुरू आहे. (Fintech companies probed by Competition Commission)
या संदर्भातील अहवाल लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता त्यांनी सुचित केली. डिजिटल मार्केटमध्ये काही कंपन्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत असल्याच्या तक्रारी समाज माध्यमावर येत होत्या. मात्र स्पर्धा आयोगाने या तक्रारीमुळे ही चौकशी सुरू केली आहे की, इतर कारणामुळे याचे स्पष्टीकरण मिळू शकले नाही. भारत आता वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे विविध कंपन्यादरम्यान स्पर्धेचे योग्य वातावरण निर्माण होण्याची गरज आहे.
काही बड्या कंपन्यांनी आपल्या एकाधिकारशाहीचा नकारात्मक वापर करू नये यासाठी स्पर्धा आयोग विविध बाबीकडे लक्ष ठेवून असतो. त्याचाच एक भाग म्हणून काही फिनटेक कंपन्यांच्या कारभाराची चौकशी केली जात असल्याचे दिसून येते. या अगोदर स्पर्धा आयोगाने गुगल संदर्भात कारवाई केली होती. गुगल प्ले स्टोअर संदर्भात गुगलची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश स्पर्धा आयोगाने 15 मार्च रोजी देण्यात आले दिले आहेत.
चित्रपट वितरकांची चौकशी
चित्रपट क्षेत्रातील काही कंपन्यांचीही चौकशी चालू असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः चित्रपट वितरणातील काही कंपन्यांची चौकशी केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. डिजिटल तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत या कंपन्यांच्या कामकाजात बदल होत असतो. त्यामुळे स्पर्धा आयोगाला आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन या कंपन्याकडे लक्ष ठेवावे लागते.

