कारवाई करण्यासाठी रेल्वे विभागाकडून तीन पथकांची स्थापना
पुणे – पुणे व पिंपरी-चिचवड शहरातील शिवाजीनगर, घोरपडी, हडपसर, पिंपरी-चिंचवड आदी परिसरातील रेल्वे मार्गालगतच्या वस्त्यांत नागरिक राहतात. येथील नागरिक रेल्वे मार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत शौचास बसतात. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी सकाळच्या सुमारास संगमपूल ते शिवाजीनगर या रेल्वे मार्गावर चालत जाऊन पाहणी केली असता शौचास बसलेले नागरिक आढळून आले. या नागरिकांमुळे घाणीचे साम्राज्य पसरत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी 3 पथकांची नेमणूक केल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील रेल्वे मार्गालगत असलेल्या वस्तीतील नागरिकांना महापालिकेने शौचालये बांधून दिलेली आहेत. परंतु, सकाळी व रात्रीच्या सुमारास नागरिक बिनदिक्तपणे शौचास बसलेले दिसतात. या नागरिकांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना लोहमार्गाची देखभाल, दुरुस्तीच्या कामात अडथळे व घृणास्पद परिस्थितीत नाईलाजास्तव काम करावे लागते. या नागरिकांमुळे लोहमार्गावर असलेली खडी विस्कळीत होत असून सिग्नल उपकरणांमधील संपर्कात अडथळा येतो. ट्रॅकवर पडलेल्या घाणीमुळे मार्गाची देखभाल, नट बोल्ट, रिले यंत्रणांमध्ये बिघाड होत असल्याचे, रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
उघड्यावरील शौचास बसणाऱ्यांना 5 हजार दंड
उघड्यावरील शौचाला जाणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी नेमलेल्या 3 पथकांकडून दररोज सकाळी व रात्रीच्या सुमारास संगम ब्रिज, पुणे स्थानक ते शिवाजीनगर, शिवाजीनगर स्टेशन परिसर, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी या ठिकाणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच, या नागरिकांवर राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) च्या सूचनेनुसार जास्तीत जास्त 5 हजार रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
बारा दिवसांत 42 हजारांहून अधिक दंड वसूल
मोहिमेंतर्गत आतापर्यंत 125 जणांना रेल्वे मार्गावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये अद्यापपर्यंत 42 हजार रुपयांहून अधिक दंड आकारला आहे. खुल्यावर शौच करणाऱ्यांविरूद्ध कारवाईची मोहीम सुरू आहे. या व्यक्तींना केवळ दंडच भरावा लागणार नसून त्यांनी केलेली शौचाची जागाही स्वच्छ करून द्यावी लागणार असल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितले.