Pimpri : महापालिका कर्मचार्याची आर्थिक देवाण-घेवाण?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवटीत भ्रष्ट व गैरकारभार वाढल्याची अनेक प्रकरणे आहेत. त्यातच आता थेट महापालिकेच्या विभागांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याचे पहायला मिळत आहे. लेखा विभागात एका खासगी व्यक्तींकडून महापालिका कर्मचारी रोख पैसे घेतानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र, लेखी तक्रार नसल्याचे सांगून पालिका अधिकार्यांकडून याबाबत हात वर केले जात आहेत.
समाज माध्यमांवर सामाजिक कार्यकर्त्यांकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तळमजल्यावरील लेखा विभागातील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये एक खासगी व्यक्ती विभागात येऊन टेबलावर बसलेल्या एका पालिका कर्मचाऱ्याला पैसे देत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर लेखा विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. उलट लेखी तक्रारी आल्यानंतर कारवाई करू, असे अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेत आता अधिकारी, कर्मचार्यांना पैसे घेण्याची सूट आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेतील पैसै घेतानाचा हा प्रकार व्हायरल झालेला असतानाच तातडीने लेखा विभागात सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आल्याचे पहायला मिळाले. विभागाच्या दारातच नागरिकांना अडवून विचारणा केली जात आहे. तसेच चित्रीकरण किंवा कर्मचार्यांना भेटण्याबाबत अडविण्यात येत आहे.
समाज माध्यमांवर अनेक व्हिडिओ येत असतात. माझ्यापर्यंत या प्रकाराबाबत कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल.
– प्रवीण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका





