पिंपरी – एसटीच्या वल्लभनगर आगाराला प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतुकीने देखील हातभार लावला आहे. एसटीने राज्यभरात सुमारे 11 हजार किलोमीटर अंतर 60 फेऱ्यांमध्ये पार करत मालवाहतुकीतून तीन महिन्यांत सुमारे सात लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. या मालवाहतुकीतून एसटीचा आर्थिक हातभारच लागला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे विविध योजना प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी राबविल्या जातात. गावागावात पोहचलेली एसटी करोनाच्या काळात प्रवाशांसाठी बंद होती, त्या वेळी मालवाहतुकीसाठी त्याचा वापर वाढला. कार्गो सेवेला त्या वेळी मोठा प्रतिसाद लाभला. आजही सुरक्षित आणि माफक दरांमुळे एसटीच्या मालवाहतूक सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालवाहतुकीमध्येव विविध साहित्य, सामानाबरोबरच बालभारती प्रकाशनाची पुस्तके राज्यभर पाठविण्यासाठी केला जात आहे. विविध कंपन्यांचे साहित्य, पुस्तके, घरसामान आदींच्या वाहतुकीतून तिजोरीत सात लाख रुपयांची भर पडली आहे. या मालवाहतुकीमधून नवीन वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत एसटीला सात लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
पिंपरी चिंचवड नगरी ही औद्योगिक नगरी म्हटली जात असली तरी आता तिची वाटचाल मेट्रोसिटीकडे होत आहे. असे असतानाही शहरातील एकमेव असलेल्या वल्लभनगर आगारातून मालवाहतूक सेवा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. या वाहतूक सेवेद्वारे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांचे एकूण उत्पन्न 6 लाख 92 हजार मिळाले आहे.
सध्या लग्नसराई सुरू आहे. तसेच उन्हाळा सुरू झाल्याने त्यासह इतर वस्तूंची वाहतूक सुरू झाली आहे. त्यात विविध प्रकारचे साहित्यांसह पुस्तकांचाही समावेश आहे. घरसामान आणि इतर साहित्यांची वाहतूक वाढली आहे. खासगी सेवेहून अधिक तत्पर, सुरक्षित आणि माफक दरामुळे एसटीच्या मालवाहतूक सेवेला नागरिक प्राधान्य देत आहेत, असे वल्लभनगर आगारातून सांगण्यात आले.
असा आहे प्रति किलोमीटरचा दर
एसटीच्या मालवाहतुकीसाठी 200 किलोमीटर अंतरासाठी प्रति किलोमीटर 57 रुपये आणि 200 पेक्षा अधिक किलोमीटरसाठी प्रति किलोमीटर 55 रुपये असे दर आकारले जातात.