मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन; यंत्रणेस केल्या सूचना
पुणे – करोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुण्यात वाढत्या रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टीने बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे. यामध्ये महानगरपालिकेने पुढाकार घ्यायला हवा. बेडची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी यासाठी राज्यशासन महापालिकांना आर्थिक मदत निश्चित करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री दत्तात्रय भरणे आदींसह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्याबरोबरच राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यात करोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करताना सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असून गाफील राहता कामा नये. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याबाबत महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच उपचारापासून रुग्ण वंचित राहू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. यासाठी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी राबविण्यासाठी विकेंद्रीकरण करावे.
तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बऱ्याचदा रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येत आहे. रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध व्हावा, यासाठी खासगी प्रयोगशाळांनी करोना अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना परस्पर तपासणी अहवाल न देता संबंधित महापालिका यंत्रणेला द्यावा, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
मुख्यमंत्री म्हणाले…
– पुण्यातील जम्बो रुग्णालयाचे काम गतीने करावे.
– प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनविण्याच्या सूचना दिल्या असून यामुळे करोना उपाययोजनामध्ये सुसूत्रता येईल.
– परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे.
– राज्यात व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देत आहेत. महापालिकांना करोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने आर्थिक मदत करण्यात आली असून यापुढेही मदत देण्यात येईल.
– ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू रोखण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात.
– संगणकीय प्रणालीमध्ये बेड व्यवस्थापन व अन्य आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी.
– झोपडपट्टी परिसरात छोटी घरे असल्यामुळे याठिकाणी गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरणांवर भर द्यावा.