नवी दिल्ली – रुपयाचे मूल्य चलन बाजारातील विविध घडामोडीच्या आधारावर ठरत असते. रुपयाचे मूल्य विशिष्ट पातळीवर असावे अशी अर्थमंत्रालयाची भूमिका नाही या मताचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुनरुच्चार केला आहे. 2025 या वर्षात आतापर्यंत रुपयाचे मूल्य पाच टक्क्यांनी कमी झाले आहे. अशा परिस्थितीत आयात वस्तू महागात पडत आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्य लोक वापरत असलेल्या आयात वस्तू अधिक महाग होणार आहेत. जागतिक व्यापार युद्ध, भूराजकीय तणाव आणि अमेरिकेने भारतावर लादलेले 50 टक्के आयात शुल्क या कारणामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम झालेला आहे. दरम्यान रुपयाचे मूल्य सध्या आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर आहे आणि अशा परिस्थितीत रुपयाचे मूल्य कमी व्हावे, असे सरकारची इच्छा असल्याचे समजले जाते. आतापर्यंत रुपयाचे मूल्य पाच टक्क्यांनी कमी झाले असतानाच आणखी दोन ते तीन टक्के मूल्य कमी झाल्यानंतर रुपयाचे मूल्य स्थिर पातळीवर राहण्यास मदत होईल, असे सरकारला वाटते. भारताबरोबरच चीनचीही अमेरिकेला होणारी निर्यात कमी झाली आहे. अशा परिस्थितीत चीन आपल्या स्वस्त वस्तू अमेरिकेशिवाय इतर देशात रिचविण्याचा प्रयत्न करत आहे. चीनमधील वस्तू भारतीय वस्तूंच्या दरांच्या तुलनेने स्वस्त असल्यामुळे चीनकडून आयात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. चीन ज्याप्रमाणे स्वतःच्या चलनाचे मूल्य कमी पातळीवर ठेवून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करतो तसाच प्रयत्न भारतही करणार असल्याचे बोलले जाते. रुपया घसरत असल्यामुळे परदेशी गुंतवणूक परत जात आहे. त्याचा पुन्हा रुपयाच्या मूल्यावर दबाव येत आहे. त्याचबरोबर खनिज तेलासाठी भारताला जास्त डॉलर मोजावे लागत असल्यामुळेही रुपयांच्या मूल्यावर परिणाम होणार असल्याचे समजले जाते. पहिल्या, दुसर्या तिमाहीच्या विकासदराबाबत समाधान व्यक्त करून सितारामन यांनी सांगितले की, एकूण परिस्थिती पाहता पूर्ण वर्षाचा विकासदर किमान सात टक्के राहील याबद्दल आता खात्री निर्माण झाली आहे. जीएसटी परिषदेने पुढाकार घेऊन करांच्या दरात कपात केल्यामुळे दुसर्या तिमाईचा विकासदर 8.2% पर्यंत जाण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी केले. आता पहिला सहा महिन्याचा विकास दर आठ टक्क्यापर्यंत गेला आहे.