नवी दिल्ली – माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सरकारकडे नव्या कल्पनांचा अभाव आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुन्याच मार्गावरून चालत आहेत. कॉंग्रेसच्या सरकारांनी १९९१ आणि २००४ यावर्षांत वेगळा मार्ग पत्करला. तसे करण्याची विद्यमान अर्थमंत्र्यांची इच्छा दिसत नाही, असे ते म्हणाले. सत्तारूढ भाजप मध्यमवर्ग आणि बिहारमधील मतदारांना आकृष्ट करू पाहत असल्याचे अर्थसंकल्पातून सूचित होते. अर्थसंकल्पीय घोषणांचे स्वागत कर भरणारे ३.२ कोटी मध्यमवर्गीय आणि बिहारचे ७.६५ कोटी मतदार करतील. पण, उर्वरित भारतासाठी दिलासादायी शब्दांशिवाय अर्थमंत्र्यांकडे काही असल्याचे दिसत नाही. अर्थव्यवस्थेची गती मंदावत असल्याकडे आम्ही लक्ष वेधले. त्यावर विश्वास न ठेवणारे आता तो ठेवतील. योजनांची आखणी आणि अंमलबजावणी याविषयीची सरकारची क्षमता कमी झाल्याचेही आम्ही नमूद केले होते. त्यावरही विश्वास न ठेवणारे आता तो ठेवण्याची आशा वाटते, असे चिदंबरम पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. भांडवली खर्चाच्या तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. मात्र, गतवर्षाचा अनुभव लक्षात घेता उद्दिष्ट गाठण्याच्या सरकारच्या क्षमतेविषयी साशंकता वाटते, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.