कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद.. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. बेरोजगार आणि महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठी आशा होती. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राधान्य असलेले सप्तर्षी सांगितले. ज्यामध्ये सर्वसमावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे, हरित विकास, तरुणांचं सामर्थ्य आणि आर्थिक क्षेत्र अशा महत्वाच्या गोष्टींचा समावेश असल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करणार असल्याचेही सीतारामन यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची महत्वपूर्ण घोषणा यावेळी अर्थमंत्र्यांनी केली. यानुसार ऍग्रो स्टार्टअपसाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे त्यासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला देखील प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे सीतारामन यावेळी म्हणाल्या. तसेच डाळिंबासाठी विशेष हब तयार करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर भरड धान्य वर्ष साजरा करणार,मत्स्य विकासासाठी ६ हजार कोटींची विशेष तरतूद करणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सहकारातून समृद्धी साध्य करण्यासाठी नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ६३ हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार करण्यात आला. यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीत स्टोरेज सुविधा निर्माण करण्यात येतील अशी घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी केली.
सर्वसामान्यांना आजच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कृषी क्षेत्रासह नव्या लघु उद्योजकांसह महिलांना काय मिळणार याबाबतची उत्सुकता सर्वसामान्यांना लागून होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा पाचवा अर्थसंकल्प होता.





