नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षासाठी विविध विभागांच्या खर्चासाठी 51 हजार 462 कोटी 86 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केल्या. या रकमेतला बहुतांश भाग निवृत्तीवेतन आणि खतांवरच्या अनुदानासाठी दिला जाणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र सुरू झाले. पीएम श्री योजनेच्या अंमलबजावणीबाबत तमिळनाडू सरकारवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या टिप्पणीच्या निषेधात द्रमुक सदस्यांनी गदारोळ केला. घोषणाबाजी मुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आलं. मतदार याद्यांमधे घोटाळे झाल्याचा आरोप करत त्याविषयी चर्चेची मागणी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केली. सभापती ओम बिरला यांनी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावली होती. प्रश्नोत्तर काळ सुरळीत चालावा या करता सहकार्य करण्याचं आवाहन, सभापतींनी सदस्यांना केलं. अधिवेशनाचं हे सत्र 4 एप्रिलपर्यंत चालणार असून त्यात 20 बैठका होतील.