पुणे | अखेर त्यांच्याही अस्थींचे विधिवत विसर्जन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मृत व्यक्ती कोणत्या जाती- धर्माचा आहे, हे न बघता, त्या पलीकडे जाऊन सद्भावनेतून अस्थींचे बुधवारी विधिवत विसर्जन करण्यात आले. त्यामुळे बेवारस मृतांच्या अस्थींची मोक्षाची प्रतीक्षा संपली आणि त्या बेवारस मृतांच्या आत्म्याला शांती लाभली.
सर्वपित्री अमावस्येनिमित्त राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन करण्यात आले.
या वेळी अकादमीचे अध्यक्ष मंदार रांजेकर, सदाशिव कुंदेन, संचालक योगेश गोलांडे, रोमा लांडे, अमर लांडे, अकादमीचे सभासद किरण फाळके, मनोज गवळी, राजेश निकम, गणेश ओरसे,
ढोल- ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, डॉ. मिलिंद भोई, बाला शुक्ला, संजय मयेकर, शाहीर हेमंत मावळे, दगडूशेठ दत्त मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, राजेंद्र काकडे, नितीन पंडित,
पियूष शहा, सहायक आयुक्त अशोक झुळूक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तुळशीराम साबळे, आरोग्य निरीक्षक जनार्दन जाधव, महापालिकेतील कर्मचारी आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावास्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन केले जाते. या उपक्रमाचे हे १४ वे वर्ष आहे. पुण्यामध्ये दरवर्षी अनेक बेवारस मृतदेह सापडतात. त्यामुळे त्यांचे अंतिम विधी विधिवत होत नाहीत.
अशा मृतांच्या अस्थी विधिवत विसर्जित करून त्यांना शांती लाभण्याच्या भावनेतून सर्वपित्री अमावस्येला हा उपक्रम राबवला जातो.
बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून त्यांच्या आत्म्यास शांती आणि सद्गती लाभावी, यासाठी मंत्रोच्चार आणि अध्यायांचे पठण करण्यात येते, अशी माहिती रांजेकर यांनी दिली.

