….अखेर नेवासा शहरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

नेवासा – येथील खोलेश्वर गणपती मंदिर चौक ते नगरपंचायत चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यापाऱ्यांनी आणि फळे विक्रेत्यांनी हातगाड्या लावून अतिक्रमण केले होते. ज्यामुळे संत ज्ञानेश्वर मंदिराकडे येणाऱ्या भाविकांच्या वाहनाला वाट मिळत नव्हती.
अखेर शनिवार (दि.१८) रोजी सकाळी १० वाजता शहरातील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढून टाकण्यात आले. अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू होताच व्यापाऱ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात प्रशासनाला विशेष सहकार्य केले. ज्यामुळे रस्त्याचा कोंडलेला श्वास अखेर मोकळा झाला.
समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉ. करणसिंह घुले यांनी येथील अतिक्रमण काढण्याची मागणी नेवासा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेली होती. ज्यानंतर ८८ व्यापाऱ्यांना रस्त्याच्या दुतर्फा मध्यभागापासून सुमारे १२ मिटर पर्यंतचे असलेले अतिक्रमण काढून टाकण्याची मुदत दि.१० जानेवारीपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली होती.
शहरातील काही व्यापाऱ्यांनी ही अतिक्रमणे स्वत: काढून घेतली होती. तर काही व्यापाऱ्यांनी ही अतिक्रमणे न काढल्यामुळे शनिवारी दि.१८ रोजी सकाळी १० वाजता पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी अतिक्रमण विभाग आले होते. मात्र व्यापाऱ्यांनी स्वत:हूनच खेळीमेळीच्या वातावरणात सदरील अतिक्रमणे काढून घेत प्रशासनाला खेळीमेळीच्या वातावरणात विशेष सहकार्य केले.





