प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये प्रशासकराज होते. गेल्या चार वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक रखडली होती. अखेर राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा केली असून येत्या १५ जानेवारीला शहरामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर त्याच्या दुसऱ्या दिवशीच मतमोजणी होऊन पिंपरी चिंचवड महापालिकेवर कोणाची सत्ता असणार हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक जाहीर होताच शहरात आचारसंहिता लागली असल्याचे देखील निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.सन २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. त्यावेळी भाजपने पहिल्यांदाच ७७ जागांवर यश मिळवत महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली होती. यावेळी एकसंघ राष्ट्रावादी काँग्रेसने ३६ जागा मिळवल्या होत्या. तर शिवसेना ९ आणि मनसेने एका जागेवर यश मिळवले होते. तर ५ अपक्षांनी विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली होती. या सर्व नगरसेवकांची मार्च २०२२ मध्ये मुदत संपली. मात्र, कोरोना प्रादुर्भाव, ओबीसी आरक्षणाचा तिढा यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. दरम्यानच्या काळात राज्यामध्ये अनेक बदल झाले. त्याचे पडसाद शहरामध्ये देखील पडले असून शहरातील राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यामध्ये दोन गट पडले आहेत. राज्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महायुती असली तरी शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये फारसे आलबेल नाही. त्यामुळे महापालिका निवडणूक हे पक्ष एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार याकडे लक्ष लागले आहे. ३२ प्रभागातून १२८ नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने ३२ प्रभागांची अंतिम रचना केली आहे. या ३२ प्रभागामधून चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने १२८ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. निवडणुकीसाठी ३२ प्रभागांमधील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबसी) आणि महिलांसाठीच्या राखीव जागांची सोडत पूर्ण झाली आहे. १२८ नगरसेवकांच्या जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे ६४ नगरसेविका आणि ६४ नगरसेवक आहेत. अनुसूचित जातीसाठी (एससी) २० जागा, तर अनुसूचित जमातींसाठी (एसटी) ३ जागा आरक्षित आहेत. तसेच ओबीसींसाठी ३४ जागा राखीव आहेत. तर यामध्ये महिलांसाठी एससी अंतर्गत १० जागा, एसटीमध्ये २ आणि ओबीसीमध्ये १७ जागा महिलांसाठी राखीव आहेत. याशिवाय सर्वसाधारण जागांमध्ये ३५ जागा महिलांसाठी आहेत. असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी २३ डिसेंबरला सुरूवात होणार आहे. त्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत असेल. त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी ३१ डिसेंबरला करण्यात येणार आहे. तेव्हापासून २ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत असणार आहे. अर्ज माघारी घेतेल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२८ जागांसाठी किती उमेदवार रिंगणात असतील याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निवडणूक चिन्हांचे वाटप ३ जानेवारीला होणार आहे. तर प्रत्यक्षात १५ जानेवारीला शहरामध्ये मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल लागणार आहे.