Satara | अखेर सातारा झाला महायुतीचा बालेकिल्ला…!

सातारा – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी लागलेल्या निकालाने भल्याभल्यांचे अंदाज कोलमडले. सातारा जिल्ह्याच्या निकालांनीही अनेकांना चकवा दिला. काँग्रेसचा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने ताब्यात घेतला होता. तो बालेकिल्ला आता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला झोपवत आपल्याकडे हिसकावून घेतला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाने एकाच मतदारसंघात उरलेली काँग्रेसही लयाला गेली आहे. बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे या दोन मातब्बर माजी मंत्र्यांच्या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षही नेस्तनाबूत झाला आहे. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षाने सर्व आठही जागा जिंकल्या. काँग्रेससह शरद पवारांचे वर्चस्व उद्ध्वस्त करत भाजपने जिल्ह्यावर वर्चस्व मिळवून साताऱ्याच्या राजकारणात नवा इतिहास नोंदवला.
शरद पवारांचा सातारा जिल्ह्यात पराभव होईल, असे भाकित काही वर्षांपूर्वी कुणी केले असते तर त्याला वेड्यात काढले असते. काँग्रेसी विचारांच्या या जिल्ह्यात भाजप, शिवसेना किंवा इतर कोणत्याही विचारांचा पक्ष विजयी होईल आणि काँग्रेसी विचारांचा सुपडासाफ होईल ही कल्पनासुद्धा कुणी केली नसेल. कारण हा जिल्हा काँग्रेसची मजबूत पेरणी करणाऱ्या यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांचा होता. पण आता सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. सातारा जिल्हा अखेर भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. राज्यपातळीवरील देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी गेल्या काही वर्षे चंग बांधून त्यांचे स्वप्न साकारले आहे. अर्थातच या स्वप्नपूर्तीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अतिआत्मविश्वासाचाही भाग आहेच. ठाणे जिल्ह्यात वर्चस्व असलेले आणि गेल्या अडीच वर्षात राज्याचे नेतृत्त्व करणारे एकनाथ शिंदे मूळचे याच जिल्ह्यातील आहेत. अडीच वर्षांच्या काळात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी जिल्ह्याला पाणी तसेच इतर प्रश्नांसाठी भरभरून निधी देण्यात सढळ हातांनी मदत केली. विकास कामांचा डोंगर उभा केला. निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या लाडकी बहिण योजनेमुळे महिलांचे वाढलेले मतदान कुणाला मिळाले हेही या निकालातून स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ पासून जिल्ह्यात वेगळ्या अर्थाने बेरजेचे राजकारण केले. जयकुमार गोरे, अतुल भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले असे मातब्बर नेत्यांना आपल्याकडे आणले.
नंतर खासदार उदयनराजे भोसले यांनाही आपलेसे केले. मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस आणि क्षीण झालेली काँग्रेस दोन्ही पक्षांना दुबळे करुन टाकण्याची खेळी ते करत राहिले. अखेर यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांचा पदोपदी उल्लेख करत राजकारण करुन वर्चस्व ठेवणाऱ्या नेत्यांना त्यांनी जमिनीवर आणण्याचे काम केले. विशेषतः शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या जिल्ह्याने यावेळी त्यांना साथ दिली नाही. मात्र, अजित पवार यांच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करत वेगळाच संदेश यावेळी दिला.
साताऱ्यात ओन्ली शिवेंद्रबाबाच!
सातारा जावळी मतदारसंघाची निवडणूक सुरवातीपासून एकतर्फीच होती. निकालातही ती एकतर्फीच राहिली. भाजपच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विजय मिळवून पाचव्यांदा विधानसभेत प्रवेश केला आहे. शिवेंद्रसिंहराजे यांचे विशेष म्हणजे त्यांचा फक्त निवडणुकीपुरता संपर्क नसतो. निवडणूक झाल्यानंतर पुढील निवडणुकीपर्यंत सातारा आणि जावळी तालुक्यात पायाला भिंगरी बांधून ते फिरत असतात. सर्व गावांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क मजबूत आहे. मतदारसंघात विकासकामांचा डोंगर आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर पर्याय कोण याचा विचारच विरोधकांना करावा लागत होता. त्यामुळे महाविकास आघाडीला या मतदारसंघात उमेदवार ठरवता येत नव्हता. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे होता. पण परिस्थिती पाहून त्या पक्षाने या मैदानातून पळ काढत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उमेदवारी देऊन टाकली. सर्व पक्षांतून फिरून आलेल्या अमित कदम यांना ही उमेदवारी मिळाली. एका अर्थाने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी होण्याची संधीच मिळाली. त्यांच्या प्रचाराच रोख त्या दिशेनेच होता. खासदार उदयनराजे भोसले व भाजपसह इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी एकजिनसीपणे प्रचारात उतरले. अपेक्षेप्रमाणे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मोठ्या विक्रमी मतांच्या फरकाने विजय मिळविला.
वाईत मकरंद पाटीलच नायक!
वाईत शरद पवार यांनी मकरंद पाटील यांना पाडा पाडा पाडा म्हणत केलेल्या आवाहनामुळे सारे चित्रच बदलून गेले, अशी विरोधकांनी केलेली हवा फुसकी होती. मकरंद पाटील हेच या मतदारसंघातील लोकांच्या मनातील नायक आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. वाई मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात पाच वर्षे सातत्याने सपर्क ठेवला तरच विजय मिळू शकतो. फक्त निवडणुकीपुरते मैदानात आले तर मते मिळतात पण ती विजयांपर्यंत पोहचवू शकत नाही, हे पुन्हा अनुभवायला मिळाले. मकरंद पाटील यांचा संपर्क आणि लोकांसाठी झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळेच कुणी काही वल्गना केल्या तरी मकरंद पाटील यांच्याच गळ्यात विजयाची माळ पडणार होती. त्यात मकरंद पाटील यांचे नेहमीचे प्रतिस्पर्धी मदन भोसले या मैदानात नव्हते. शरद पवार यांनी माजी मंत्री मदनराव पिसाळ यांच्या घरात उमेदवारी दिली. मात्र, मतदारसंघात ऐनवेळी संपर्क साधणे कठीण होते. शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी बंडखोरी केली. मकरंद पाटील पक्ष फुटल्यावर अजित पवार यांच्याकडे गेल्यामुळे शरद पवार यांनी सौ. अरुणादेवी पिसाळ यांच्यासाठी फिल्डिंग लावली. परंतु, संपर्क, विकासकामे, दोन साखर कारखाने वाचविण्यासाटी केलेले प्रयत्न यामुळे मकरंदआबाच अखेर इथले नायक ठरले.
कोरेगावातील शिंदेशाही महेश यांचीच!
दोन मातब्बर नेत्यांमधील लढाईकडे राज्याचे लक्ष होते ते कोरेगावमध्ये. विद्यमान आमदार व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे आणि माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्यात इथे लढत झाली. दोन्ही नेते आक्रमक. पण शशिकांत शिंदे यांना यावेळीही म्हणजे पाच वर्षांत सलग तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. महेश शिंदे यांनी निवडून आल्यापासून मतदारसंघात ठेवलेला संपर्क, मोठ्या प्रमाणावर आणलेला निधी आणि विकासकामे ही जमेची बाजू ठरली. पाच वर्षांपूर्वी पराभव झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचा संपर्क कमी झाला होता. विधानपरिषदेत त्यांना संधी मिळाली. मात्र, ते पुन्हा सक्रिय झाले ते लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतरच. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. लोकसभेत आणि आताही त्यांना पराभवच स्वीकारावा लागला. राज्यातील सत्तांतराच्या वेळी एकनाथ शिंदे यांना मदत करण्यात महेश शिंदे यांचा पुढाकार राहिला. त्यामुळे त्यांच्या धडाडीने विकासकामांना गती आली. लोकांनी या मतदारसंघाची सुत्रे पुन्हा एकदा महेश शिंदे यांच्याकडेच सोपविली.
माणमध्ये जयाभाऊच किंग!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सारे स्थानिक नेते एकत्र आले आणि शरद पवार यांच्या आशावादाने त्यांनी जयकुमार गोरे यांच्या पराभवाची स्वप्ने पाहिली. पण झोपेत पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवता येणार नाहीत असे सिद्ध करत जयकुमार गोरे हेच पुन्हा माण खटाव मतदारसंघाचे किंग बनले. खरं तर या दोन्ही मतदारसंघांतील लोकांनी पाण्यासाठी साठ वर्षांपासून टाहो फोडला. आश्वासनांखेरीज काहीच पदरात पडत नव्हते. अगदी शरद पवार यांनीही पाण्यासाठी काही ठोस भूमिका घेतली असे झाले नव्हते. उलट पंधरा वर्षांपासून आमदार असणाऱ्या गोरे यांनी माणध्ये पाणी आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, प्रत्यक्षात पाणी आणले. पाण्यासाठी चालणारी वणवण संपविण्याचे काम गोरे यांनी केले, ते लोकांसमोर नव्हे तर मनात होते. आघाडीच्या नेत्यांनी प्रचारात सगळ्यांच्याच पाठपुराव्यामुळे पाणी आले, असा तोकडा युक्तीवाद करत गोरे यांच्या या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले.
त्याचे खरे कारण त्यांना पाण्याबाबत काय केले याचे उत्तर देणे कठीण होते. माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्यासह गोरे यांना विरोध करणारे त्यांचे बंधू शेखर गोरे यावेळी त्यांच्याबरोबर आले. ही त्यांची जमेची बाजू ठरली. विरोधकांनी एकजूट केली पण प्रभाकर घार्गे यांना ती विजयापर्यंत नेऊ शकली नाही. पाणीप्रश्नावरील ठोस भूमिका, विकासकामे आणि भविष्यातील औद्योगिक व शैक्षणिक क्रांती अशी भूमिका घेत देवाभाऊंंबरोबर असणारे जयाभाऊ हेच किंग ठरले.





