पिंपरी – पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शनिवारी (दि. ३०) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून वाघेरे यांचे स्वागत केले आहे. २५ डिसेंबर रोजी वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या बैठकीतच त्यांचा प्रवेश निश्चित झाला होता. वाघेरे यांच्या प्रवेशाने मावळ लोकसभेसाठी त्यांचा चेहरा ठाकरे गटातून समोर येत आहे.
या वेळी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, मावळ जिल्हाप्रमुख माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार आदीसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
संजोग वाघेरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी मावळमधून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. सध्या ठाकरे यांच्या पक्षाकडून मावळसाठी तगडा उमेदवार नाही. ही संधी हेरून वाघेरे यांनी पक्षप्रवेश करत आपली उमेदवारी निश्चित केल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे. वाघेरे यांच्या प्रवेशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पिंपरीत खिंडार पडल्याची चर्चा आहे.
विविध मुद्यांवर कार्यकर्त्यांसह विचार केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे देतील ती जबाबदारी पार पाडू, असे प्रतिपादन वाघेरे यांनी या वेळी केले.