अखेर राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी; वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर कारवाई

Rajesh Shah | मुंबईतील वरळी परिसरात रविवारी हिट अँड रनच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली. मिहीर शाह या तरुणाने दोन जणांना धडक दिल्याने या भीषण अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते होते. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
या घटनेनंतर फरार झालेला आरोपी मिहिर शाहला अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने उपनेते राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ‘शिवसेना (शिंदे गट) मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राजेश शाह, पालघर यांना शिवसेना उपनेता पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे,’ असे म्हटले आहे.
कोण आहेत राजेश शाह?
शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पालघर जिल्हाप्रमुख असलेल्या राजेश शाहांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर राजेश शाह यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांची पालघर जिल्ह्याचे उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मिहिर शाहला अटक
वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला मंगळवारी मुंबई क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आली आहे. त्याला शहापूरमधून अटक करण्यात आली. या प्रकरणात मिहीर शाहाची आई आणि बहिणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांच्याबरोबर आरोपीला मदत करणाऱ्या 12 जणांनाही मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
नेमकं काय घडलं ?
मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्य स्कुटरवरुन जात असताना बीएमडब्यू कारने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि दोघंही कारच्या बोनटवर पडले. कार चालकाने कार न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेली. प्रदीप नाखवा हे बाजूला फेकले गेले तर कावेरी नाखवा ह्या बोनटवरून खाली पडल्या आणि त्यांच्या साडीचा पदर कारमध्ये अडकल्याने त्या फार पुढे फरफटत गेल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा:
‘मुस्लिम महिलाही पतीकडे पोटगी मागू शकतात’ सर्वोच्च न्यायालयाचा ‘मोठा निर्णय’





