नवी दिल्ली – भारताची प्रसिद्ध विमानवाहू नौका आयएनएस विराटचा प्रवास आता संपला असून ती गुजरातमधील अलंग बंदरात दाखल झाली आहे. याठिकाणी ही नौका तोडण्यात येणार आहे. आयएनएस विराट तब्बल तीस वर्षांच्या सेवेनंतर मार्च 2017 मध्ये नौदलातून निवृत्त झाली. जहाज पुर्नवापर क्षेत्रात काम करणाऱ्या श्रीराम समूहनाने यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या लिलावात आयएनएस विराट विकत घेतली. या नौकेवर रात्रंदिवस काम केलेल्या नौदलाच्या जवानांप्रती आदर आणि कृतज्ञ असल्याचे श्रीराम ग्रुपचे अध्यक्ष मुकेशभाई पटेल यांनी म्हटले आहे. या जहाजाच्या प्रत्येक सुट्या भागाशी भावना निगडीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ब्रिटीश नौदलाच्या अनेक जहाजांसह सुमारे 200 जहाजे आतापर्यंत विलग करण्याचा अनुभव श्रीराम ग्रुपकडे आहे. 29 सप्टेंबर रोजी आयएनएस विराट शेवटच्या प्रवासासाठी अलंग किनाऱ्यावर आली. किनाऱ्यापासून ती 3000 फुटांवर उभी आहे. तिथून ती श्रीराम ग्रुपच्या पुनर्रवापर प्लॉटवर आणली जाईल. कोणतेही जहाज विलग करण्याआधी त्यातील तेल, धोकादायक रसायने इत्यादी गोष्टी काढल्या जातात. प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध प्राधिकरणांकडून योग्य त्या परवानग्या मिळाल्यानंतर एक ते दोन महिन्यात जहाजाच्या विलगीकरणाची प्रक्रिया सुरु होते. जहाज पूर्णपणे विलग करण्यासाठी नऊ ते बारा महिन्यांचा कालवधी लागतो. आयएनएस विराट ही नौका देशभक्तीचे प्रतिक असल्याने या नौकेतील धातूच्या वस्तू, केबल्स, विद्युत मोटारी, स्टील, लाकडी चौकटी आणि भंगारात काढण्यात येणाऱ्या अन्य वस्तूंबाबत आतापासूनच नागरिक चौकशी करू लागले आहेत. कारण ही युद्धनौका असल्याने यामध्ये वापरण्यात आलेले पोलाद अतिशय उच्च प्रतीचे आहे. या नौकेत अशा उच्च प्रतीच्या पोलादाचा भरपूर वापर करण्यात आला असल्याने त्याचा वाहनांच्या सुट्या भागांसाठी वाहन कंपन्या विचारणा करू लागल्या आहेत. त्यातून आपल्या वाहनाचा आयएनएस विराटशी थेट संबंध असल्याचे ब्रँडिंग त्या कंपन्यांना करता येते. या युद्धनौकेच वजन 22,600 टन आहे. तिच्या विलगीकरणासाठी सुमारे 250 ते 300 वेल्डर्स, तंत्रज्ञ, मजूर काम करतील. सोमवारी जेव्हा ही युद्धनौका अलंग बंदराजवळ आली तेव्हा या नौकेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्रीय जहाज मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. अलंग बंदरातील शिप ब्रेकिंग यार्ड देशाच्या दक्षिण किनाऱ्यावर सौराष्ट्रात आहे. भावनगर जिल्ह्यातील कॅम्बे आखातात हे यार्ड आहे. 1983 पासून या ठिकाणी जगभरातील अनेक जहाजे तोडण्याचे काम झालेले आहे.