पुण्यात महापालिकेसाठी एकत्र लढणार; अंतिम निर्णय मुंबईत होणार पुणे : महापालिकेत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुण्यात एकत्र लढण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ही माहिती दिली. मात्र, या बैठकीत जागा वाटप तसेच कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी खासदार वंदना चव्हाण, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशात तांबे तसेच अंकुश काकडे उपस्थित होते. मात्र, दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्यास विरोध असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. यामुळे मंगळवारी दिवसभर प्रशांत जगताप यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा शहरात सुरू होती. मात्र, प्रशांत जगताप यांचा राजीनामा पक्षाकडे आल्याची कोणतीही माहिती नसल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले. प्रशांत जगताप यांना सोबत घेऊनच आम्ही या निवडणुका लढवू, असा विश्वासही काकडे यांनी व्यक्त केला. काकडे पुढे म्हणाले की, पक्षात मतभेद असले तरी प्रदेशाध्यक्ष तसेच शहर कार्यकारिणीच्या बैठकीत ९० टक्के कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवण्यास यापूर्वी झालेल्या बैठकीत सहमती दर्शवली होती. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि निवडणूक प्रमुख सुप्रिया सुळे घेतील, असेही काकडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निर्णय झालेला आहे. मात्र, आम्ही आघाडीत जाणार नाही. राष्ट्रवादीसोबतच लढावे, अशी आमची भूमिका आहे. त्यानुसार चर्चा झाली असून उद्या (बुधवार) संध्याकाळपर्यंत जागा वाटप तसेच इतर निर्णय घेतले जातील. आम्ही काँग्रेस अथवा कोणत्याही आघाडीत सहभागी होणार नाही. अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही – सुभाष जगताप ( राष्ट्रवादी काॅग्रेस) प्रशांत जगताप नॉट रिचेबल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केल्याची चर्चा असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप मंगळवारी दिवसभर नॉट रिचेबल होते. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाच्या बैठकीनंतर जगताप यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. मात्र, आपल्याकडे अथवा प्रदेशाध्यक्षांकडे कोणताही राजीनामा आलेला नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.दरम्यान, प्रशांत जगताप यांनी सोशल मिडीयावरून मुंबईत सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आघाडी आधी जागा वाटप ठरवा – काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने आता पुण्यातील आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. यापूर्वी पुण्यात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकत्रित बैठक झाली होती. त्यावेळी निवडणुका झाल्यानंतर कोणताही पक्ष आघाडीतून बाहेर जाणार नाही, यासाठी लेखी करार करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. आता आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झाल्याने काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीला आघाडीत घ्यायचे असल्यास आधी जागा वाटप निश्चित व्हावे, त्यानंतरच आघाडीबाबत चर्चा केली जाईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी आघाडीत आल्यास जागा वाटपावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींनी याकडे लक्ष दिले नाही, तर आम्हाला वेगळा मार्ग निवडावा लागेल, असेही शिंदे म्हणाले.