Pune : अखेर दोन दिवसानंतर गोल्फ क्लब व्यवस्थापकाविरोधात येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल

Pune | पुण्यातील येरवडा भागातील उड्डाणपुलावर अशी एक घटना घडली आहे की यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या अनेक वाहनांना अचानक ब्रेक लावण्याची वेळ आली. यामुळे अचानक अनेक वाहने पूलावर थांबल्याने एकच गोंधळ उडाला.
येरवडा येथील गोल्फ क्लब कोर्समध्ये गोल्फ खेळताना खेळाडूने मारलेला चेंडू थेट बाहेरील उड्डाणपूलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या छातीला लागला. त्यानंतर चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांवर देखील आदळला. यामुळे अनेक वाहनांना अचानक ब्रेक दाबण्याची वेळ आली. अचानक आलेल्या चेंडूमुळे वाहनचालकांचा एकच गोंधळ उडाला.
या प्रकरणी प्रणील कुसळे या ३५ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाने गोल्फ क्लब प्रशासनाविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. घटना शनिवारी घडून देखील गोल्फ क्लब प्रशासनाविरोधात कोणतीही अॅक्शन घेण्यात आली नव्हती. अखेर व्यवस्थापकाविरुद्ध दोन दिवसांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना कशी घडली?
संबंधित तरुण आणि त्याचा मित्र दुचाकीवरून गुंजन चौकातून उड्डाणपूलावरून जेल रस्त्याकडे जात होते. त्यावेळी डावीकडून वेगाने गोल्फचा चेंडू तरुणाच्या छातीवर जोरात आदळला. यामुळे तरुणाच्या छातीला जोराचा मारा लागला. त्यानंतर हा चेंडू याच उड्डाणपूलावरून जाणाऱ्या अनेक वाहनांच्या काचेवर आदळला. चेंडू लागलेल्या संबंधित तरुणाने पोसिसांत तक्रारी अर्ज दिला असून या घटनेला दोन दिवस झाले तरी यावर कोणतीही अॅक्शन घेण्यात न आल्याची माहिती मिळत आहे.
यापूर्वी २०२३ मध्ये याच रस्त्यावरुन जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या तोंडाला चेंडू लागला होता. त्यानंतर आता असाच प्रकार घडल्याने रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनांचा अपघात घडला झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. यामुळेगोल्फ मैदान परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे.





