बिहारमध्ये SIR नंतर अंतिम मतदार यादी जाहीर, आता विधानसभा निवडणुकीच्या तारखेची प्रतीक्षा

Bihar Final Voter List: भारत निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी (Bihar Final Voter List) जाहीर केली आहे. विशेष गहन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर तयार करण्यात आलेली ही यादी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याच यादीच्या आधारे बिहारमधील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. आयोग ६ ऑक्टोबरनंतर कधीही निवडणुकीच्या तारखांची घोषणा करू शकतो.
बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, विशेष गहन पुनरीक्षणांतर्गत ३० सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणताही मतदार निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावाचा तपशील पाहू शकतो. या यादीत सुमारे 14 लाखांहून अधिक नवीन मतदारांचा समावेश झाला आहे, ज्यामध्ये बहुतांश 18 वर्षांवरील तरुण आहेत. या यादीत एकूण 7 कोटी 30 लाखांहून अधिक मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने ही यादी सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात भौतिक स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. तसेच, सर्व राजकीय पक्षांना अंतिम मतदार यादीची प्रत देण्यात आली आहे.
65 लाख मतदारांची नावे काढली गेली
निवडणूक आयोगाने जून महिन्यात मतदार यादी पुनरावलोकनाची प्रक्रिया सुरू केली होती. पुनरावलोकनापूर्वी बिहारमध्ये 7 कोटी 89 लाख मतदार होते. पुनरावलोकनानंतर एकूण 65 लाख मतदारांची नावे यादीतून काढण्यात आली. यामध्ये 22 लाखांहून अधिक मृत मतदार, सुमारे 35 लाख स्थलांतरित मतदार आणि 7 लाखांहून अधिक अशी मतदार होती ज्यांची नावे दोन ठिकाणी नोंदवली गेली होती. निवडणूक आयोगाने दावा-आपत्तींसाठी 30 दिवसांचा कालावधी दिला होता.
कोणत्या जिल्ह्यांतून किती मतदारांची नावे काढली?
पुनरावलोकनानंतर जाहीर झालेल्या मतदार यादीत अनेक जिल्ह्यांमधून हजारो मतदारांची नावे काढण्यात आली आहेत. यामध्ये पश्चिम चंपारणमधून 1,91,376, पूर्व चंपारणमधून 3,16,793, शिवहरमधून 28,166, सीतामढीमधून 2,44,962, मधुबनीमधून 3,52,545, सुपौलमधून 1,28,207, अररियामधून 1,58,072, किशनगंजमधून 1,45,668, पूर्णियामधून 2,73,920, कटिहारमधून 1,84,254, मधेपुरामधून 98,076, सहरसामधून 1,31,596, दरभंगामधून 2,03,315, मुजफ्फरपूरमधून 2,82,845, गोपालगंजमधून 3,10,363, सिवानमधून 2,21,711, सारणमधून 2,73,223, वैशालीमधून 2,25,953, समस्तीपूरमधून 2,83,955, बेगूसरायमधून 1,67,756, खगडियामधून 79,551, भागलपूरमधून 2,44,612, बांकामधून 1,17,346, मुंगेरमधून 74,916, लखीसरायमधून 48,824, शेखपुरामधून 26,256, नालंदामधून 1,38,505, पाटणामधून 3,95,500, भोजपूरमधून 1,90,832, बक्सरमधून 87,645, कैमूर (भभुआ) मधून 73,940, रोहतासमधून 1,56,148, अरवलमधून 30,180, जहानाबादमधून 53,089, औरंगाबादमधून 1,59,980, गयामधून 2,45,663, नवादामधून 1,26,450 आणि जमुईमधून 91,882 मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट नाहीत.
बिहार निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात शक्य –
अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आता निवडणूक आयोग ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी पाटण्याचा दौरा करून तयारीचा आढावा घेणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान दिवाळी आणि छठ पूजेनंतर ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. २४३ जागांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मागील वेळेप्रमाणे यंदाही तीन टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





