पिंपरी – चित्रपट ही एक कलाकृती असून, त्याकडे कला म्हणूनच पाहिले जावे. आशय आणि विषय पक्का असेल तर भाषेचा अडसर येत नाही. दैनंदिन जीवनाशी निगडित विषय चित्रपटांतून मांडले पाहिजेत, वास्तवाचा वेध घेतला पाहिजे, असे मत लेखक, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केले. दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ सिनेमा अभ्यासक समर नखाते यांच्या हस्ते भाऊसाहेब कऱ्हाडे यांना दिशा कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास भाजप नेते शंकर जगताप, संस्थेचे अध्यक्ष नाना शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, अभिनेते पृथ्वीराज थोरात, अभिनेत्री कालिंदी निस्ताणे, गायक वैभव शिरोळे आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना भाऊराव कऱ्हाडे म्हणाले की, शेतकरी हा सर्वांत सहनशील घटक आहे. तो नेहमी आशेवर जगतो. कधीही उमेद सोडत नाही. तसेच कोणताही चित्रपट करताना अडचणी येतातच. प्रामाणिकपणाने काम करत राहिल्यास अडचणी नक्कीच दूर होतात. नवनवे मार्ग सापडत जातात. प्रश्न सुटत जातात. चांगली माणसं भेटत जातात. त्यामुळे प्रामाणिकपणा आणि माणुसकीची कास सोडायची नाही, हे मात्र मनाशी ठाम असायला हवे. चित्रपट ही एक कलाकृती असून त्याकडे कला म्हणूनच पाहिले जावे. आशय आणि विषय पक्का असेल तर भाषेचा अडसर येत नाही. चित्रपटातून काय ताकदीने आशय मांडला जातो, त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते. प्रास्ताविक जगन्नाथ शिवले यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. राजेश सावंत यांनी आभार मानले.