Nagar : रब्बी आवर्तनासाठी सात नंबर फॉर्म भरा

श्रीरामपूर : लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी हक्काच्या पाण्यासाठी जास्तीत-जास्त सात नंबर फॉर्म भरून आपल्या पाण्याचा हक्क अबाधित ठेवावा, असे आवाहन आमदार हेमंत ओगले यांनी केले. अहिल्यानगर जलसंपदा विभागाने 31 डिसेंबर अखेर रब्बी आवर्तनाचे पाणी मागणी अर्ज शाखेच्या ठिकाणी उपलब्ध असल्याचे कळविलेले आहे.
भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी रब्बी हंगामाची तयारी जलसंपदा विभागाकडून चालू असून जलसंपदा विभागाने पाणी मागणी अर्ज भरून देण्यासाठी कळविले आहे. त्यामुळे हक्काच्या पाण्यासाठी जागरूक राहून ७ नंबर फॉर्म भरणे आवश्यक आहे आणि ती काळाची गरज देखील आहे. पाणी मागणी अर्ज मोठ्या संख्येने जलसंपदा विभागाकडे गेल्यास आपल्या पाण्याचा वाटा निश्चित होईल, असे देखील आमदार हेमंत ओगले यांनी म्हटले.
कॅनॉल, चाऱ्या व पोटचाऱ्या दुरुस्तीसाठी आपण पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करणार असून, त्याबाबत लवकरच पाटबंधारे विभागाकडे आढावा बैठक देखील घेतली जाईल. नासाडी होणाऱ्या पाण्याची बचतीकडे देखील लक्ष दिले जाईल. येणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जास्तीत-जास्त आवर्तन घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार ओगले यांनी सांगितले. पाणी मागणी अर्जाबाबत काही अडचण असल्यास आपण माझ्याशी अथवा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार ओगले यांनी केले.





