द हेग (नेदरलॅन्ड) – संयुक्त राष्ट्राचे सर्वोच्च न्यायालय असलेल्या आंतरराष्ट्रीय न्याय न्ययायालयामध्ये इस्रायलविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. गाझामध्ये नरसंहार केल्याच्या आरोपावरून दक्षिण आफ्रिकेने इस्रायलविरोधात ही याचिका दाखल केली आहे.
इस्रायलचे कृत्य नरसंहाराचेच आहे.
गाजामधील पॅलेस्टिनींना संपवण्याच्या हेतूनेच संपूर्ण पॅलेस्टाईनचा भाग असलेल्या गाझामध्ये हे हत्याकांड केले गेले असल्याचे दक्षिण आफ्रिकेने म्हटले आहे. इस्रायलने आपली लष्करी कारवाई तातडीने स्थगित करावी, असे हंगामी आदेश द्यावेत.
त्यासाठी आपल्या याचिकेवर आगामी काही दिवसात किंवा आठवड्यांमध्ये सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणीही दक्षिण आफ्रिकेने आयसीजेकडे केली आहे. जर हे प्रकरण लांबले तर त्यावरील सुनावणी अनेक वर्षे रखडण्याचीही शक्यता आहे.
इस्रायल सरकारने दक्षिण आफ्रिकेचे नरसंहाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप म्हणजे इस्रायलवरील कलंक असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. या आरोपाला कायदेशीर आधार नाही. असे आरोप करणे म्हणजे न्यायालयाचे शोषण आणि प्रतिमा गौण करण्याचा प्रयत्न असल्याचेही इस्रायलने म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिका हमासला मदत करत आहे. हमासने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यामुळेच हा संघर्ष उद्भवला आहे, असा दावाही इस्रायलने केला आहे.
इस्रायल आंतरराष्ट्रीय कायद्याला बांधील आहे आणि त्यानुसारच काम करत आहे. इस्रायलची लष्करी कारवाई स्पष्टपणे फक्त हमासला लक्ष्य करण्यासाठीच आहे. गाझामधील रहिवासी इस्रायलचे शत्रू नाहीत.
गाझामधील रहिवाशांचे कमीत कमी नुकसान व्हावे, असाच इस्रायलचा प्रयत्न आहे. तसेच गाझामध्ये मदत साहित्य पुरवण्याचा निर्णय त्याच हेतूने घेण्यात आला आहे, असेही इस्रायलने अधोरेखित केले आहे.
दक्षिण आफ्रिकनेने संयुक्त राष्ट्राच्या नरसंहार ठरावांतर्गत ही याचिका आंतराष्ट्रीय न्याय न्यायालयामध्ये दाखल केली आहे. या आंतरराष्ट्रीय करारावर इस्रायलनेही स्वाक्षऱ्या केल्या असल्यामुळे हा ठराव इस्रायलला पाळणे बंधनकारक आहे.
त्यामुळे न्यायालयाचे आदेशही पाळणे इस्रायलला बंधनकारक असणार आहे. मात्र आतापर्यंत या न्यायालयाच्या आदेशांचे पालन फारच कमीवेळा करण्यात आले आहे.
रशियालाही ठरवले युक्रेनबाबत जबाबदार
२०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय न्याय न्यायालयाने युक्रेनवरील हल्ल्याबाबत रशियालाही जबाबदार धरले आहे. युक्रेनवरील हल्ल्यादरम्यान रशियानेही मानवी जीवितहानी केली असल्याचे सांगून नरसंहाराच्या आरोपात जबाबदार मानण्यात आले आहे.
गाझावरील हल्ल्याबाबत दक्षिण आफ्रिकने पहिल्यापासूनच इस्रायलवर टीका केली आहे. गाझा आणि वेस्ट बँकेवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांची तुलना दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोंसा यांच्याकडून वांशिक दडपशाहीशी केली गेली.